Sun, Mar 24, 2019 08:27होमपेज › Nashik › प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या आठ जणांना ४३ हजारांचा दंड

प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या आठ जणांना ४३ हजारांचा दंड

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:33AM

बुकमार्क करा
मालेगाव : प्रतिनिधी

पर्यावरणाला हानिकारक ठरणार्‍या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या विक्रेत्यांविरोधात मालेगाव महापालिकेने दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. बुधवारी (दि.27) आठ दुकानदारांवर कारवाई करत 43 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरातील कचर्‍यात प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक असते. नाले, गटारी, तसेच नदीपात्रातील सांडपाण्यात प्लास्टिक मिसळून पाण्याला अडथळा निर्माण होऊन थर तयार होतात. मोसमनदीपात्रात वर्षभर ही परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे मालेगाव महापालिकेने पर्यावरणाला प्लास्टिकच्या पिशव्यांपासून असणारा धोका लक्षात घेऊन 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणली आहे. तसा महासभेने ठरावदेखील केला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध उपाययोजनांतर्गत प्लास्टिक हटावकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी सहायक आयुक्त राजू खैरनार यांच्या पथकाने सटाणा नाका, तसेच किदवाई रोड परिसरातील दुकानांची पाहणी केली. त्यात दोन होलसेल व्यापारी, तीन मिठाई व दूध डेअरी चालकांकडे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्यावर कारवाई करत 43 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

कचरा वेगळा करण्याचे मार्गदर्शन 

महापालिकेतर्फे शहरवासीयांना स्वच्छतेसाठी स्वच्छता अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अ‍ॅपवर तक्रारी कशा नोंदवाव्यात. ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवूनच घंटागाडीत टाकावा,  याचे आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. सहायक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरुद्दिन शेख, अकलाख अहमद, प्रभारी प्रमुख स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे यांनी नागरिकांना टिप्स दिल्या. याप्रसंगी प्रभाग 4 मधील मिसाली मोहल्ल्यातील नागरिक उपस्थित होते.