Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Nashik › नाशिकला ४० दिवसांचा ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’

नाशिकला ४० दिवसांचा ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:41PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

वाइन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये 1 फेब्रुवारी ते 11 मार्च असा 40 दिवसांचा इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2018 अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात वाइन मेकिंग, ग्रेप स्टॉम्पिंग, रॉयल टेंट, वाइन क्रसिंग आणि वाइनसह खाद्यपदार्थांचा आस्वादही वाइनप्रेमींना घेता येणार आहे. 

वाइन उद्योगाची भरभराट व्हावी. तसेच, या महोत्सवाच्या माध्यमातून इतरही उद्योग वाढीस चालना व पर्यटन क्षेत्र म्हणून नाशिकचा प्रचार व प्रसार व्हावा. यादृष्टीने महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. नाशिक व्हॅली वाइन क्लस्टर तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, क्रेडीबल इंडिया, नॅशनल हार्टिकल्चर व ऑपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील सह्याद्री फार्म (मोहाडी), विंचूर वाइन पार्क, मुकणे धरणामागील व्हॅलोन विनियार्डस अशा विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होणार्‍या देश-विदेशातील पर्यटक व वाइनप्रेमींसाठी विविध करमणुकीचे  कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, मुक्कामासाठी रॉयल टेंट उभारले जाणार आहेत. महोत्सवाच्या काळात दर शुक्रवार, शनिवार व रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी करमणुकीसह वाइन बनविण्याचे प्रात्यक्षिक नागरिकांना अनुभवता येणार आहे. पर्यटकांसाठी मास्टर क्लास व मास्टर शेफ क्लास असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती नाशिक व्हॅली वाइन क्लस्टरतर्फे देण्यात आली. फेब्रुवारीपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होतो. याच काळात नाशिकमधून युरोपियन देशांमध्ये सात ते आठ हजार कंटेनर द्राक्ष निर्यात होत असतात. तसेच, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश सर्वच वाइनरींमध्ये ग्रेप क्रशिंग सुरू होत असल्याने वाइन मेकर्सही नाशिकमध्येही असतात. या सर्व बाबींचा विचार करता ग्रेप हार्वेस्टसाठी फेब्रुवारी, मार्च या कालावधीची निवड करण्यात आली आहे.