होमपेज › Nashik › ‘एसीबी’च्या कारवाईत तब्बल ३६ टक्के घट!

‘एसीबी’च्या कारवाईत तब्बल ३६ टक्के घट!

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:23PM

बुकमार्क करा


नाशिक : प्रतिनिधी

राज्यातील भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. मात्र, अनेक महिन्यांपासून या विभागातील राज्यभरात सुमारे 31 तर नाशिक परिक्षेत्रातील पाच पोलीस निरीक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. रिक्‍त जागांमुळे  गेल्या दोन वर्षांत विभागाने राज्यात केलेल्या कारवाईत तब्बल 36 टक्के घट झाली आहे. 

2010 ते 4 डिसेंबर 2017  या कालावधीत विभागाने राज्यभरातील सहा हजार 256 लाचखोरांवर कारवाई केली आहे. तसेच, या कालावधीत 185 अपसंपदेच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवाईत गेल्या दोन वर्षांपासून घट झाली आहे. त्यातच विभागाचे महासंचालकपदही रिक्‍त असल्याने अतिरिक्‍त महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कारवाई केली जात आहे. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. मात्र, कालांतराने अनेकांना मुंबईतील मुख्यालयात सेवा बजवावी लागली तर अनेक पोलीस निरीक्षक रजेवर गेले किंवा त्या जागा रिक्‍तच ठेवण्यात आल्या. नाशिक परिक्षेत्रातही पोलीस निरीक्षकांच्या रिक्‍त जागांमुळे लाचखोरांविरोधातील कारवाईवर परिणाम झाला आहे. परिक्षेत्रातील नाशिक जिल्हा वगळता नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक पोलीस उपअधीक्षक आणि दोन पोलीस निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यांच्या जोडीला इतर अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र, काही महिन्यांपासून परिक्षेत्रातील पाच निरीक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. त्यातही जळगाव जिल्ह्यातील दोन्ही निरीक्षकांच्या जागा रिक्‍त असून, पोलीस उपअधीक्षकावरच सारी भिस्त आहे. तसेच, नगर जिल्ह्यातील एका निरीक्षकाची बदली झाली असून, नाशिक जिल्ह्यातही आठ पैकी दोन जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे रिक्‍त अधिकार्‍यांच्या समस्येमुळे राज्यासह नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांवर कारवाई करण्यात घट झाल्याचे चित्र आहे.