Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Nashik › सौर उर्जेवर फुलवली ३५ एकर द्राक्षबाग!

सौर उर्जेवर फुलवली ३५ एकर द्राक्षबाग!

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:24PM

बुकमार्क करा

नाशिक : रावसाहेब उगले

बागायती शेती म्हटले की, भारनियमनाचा प्रश्‍न नेहमीच आ वासून उभा असतो. परंतु, यावर मात करीत पिंपळगाव बसवंत येथील शेतकर्‍याने सौर ऊर्जा यंत्राचा पर्याय शोधत 35 एकर द्राक्षबाग फुलवली आहे.

द्राक्षबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा आटापिटा करावा लागतो. गारपीट, भारनियमन, मजूर टंचाई यासह अनेक प्रश्‍न द्राक्ष उत्पादकांसमोर असतात. अलीकडे तर भारनियमनाचा मोठा प्रश्‍न सर्वत्र उभा आहे. त्यामुळे द्राक्षबागांना वेळेवर पाणी देता येत नाही. यावर मात करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी शेततळे, पाणी साठविण्यासाठी सिमेंटच्या टाक्या असे पर्याय शोधले आहेत. परंतु, वीज नसेल तर पाण्याची टाकी भरणे शक्य होत नाही. तर, शेततळ्यातून विद्युतपंपाद्वारेच पाणी उपसावे लागत असल्याने त्यातही अनेक अडचणी असतात.

या सर्व परिस्थितीवर मात करीत पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी प्रभाकर मोरे यांनी 35 एकर द्राक्षबागांसाठी सहा लाख 50 हजार रुपये खर्चून सौर ऊर्जा यंत्र बसविले आहे. त्यामुळे सकाळी 8 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या सौर ऊर्जा यंत्रावर साडेसात अश्‍वशक्तीचा विद्युतपंप चालविला जात आहे. एकावेळी चार एकर द्राक्षबागांना पूर्ण दाबाने पाणी देणे शक्य झाले आहे. मोरे यांनी यशस्वीपणे हा निर्णय अमलात आणल्याने अन्य शेतकर्‍यांनाही हा पर्याय आवडला आहे. क्रेनोवेटिव्ह पॉवर टेक प्रा. लि. कंपनी शेतकर्‍यांना हे सौरयंत्र उपलब्ध करून देत आहे.

सौरऊर्जा यंत्राचे वैशिष्ट्ये

साडेसात अश्‍वशक्ती क्षमतेच्या मोटरसाठी पॅनल बसविण्यात आले आहे. त्याद्वारे नॉर्मल मोटर सहजतेने चालविली जाते. त्यामुळे विद्युतपंप बदलण्याची गरज नाही. आतापर्यंत दोन ते तीन एचपी क्षमतेचे विद्युतपंप चालविण्याची क्षमता असलेले सौर यंत्र होते. परंतु, साडेसात एचपी विद्युतपंप चालविले जाणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच यंत्र आहे. एकावेळी चार एकर क्षेत्राला पाणी देता येते.