Mon, Nov 19, 2018 20:05होमपेज › Nashik › शहरात बसविणार ३३०० सीसीटीव्ही कॅमेरे 

शहरात बसविणार ३३०० सीसीटीव्ही कॅमेरे 

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:48PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

कायदा व सुव्यवस्था, तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या अनुषंगाने शहरात 470 कोटींचे उच्च दर्जाचे तीन हजार 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या संदर्भात राज्य शासनाने निविदा प्रक्रिया राबविली असून, 15 फेब्रुवारीला निविदा उघडली जाणार आहे. शहराच्या द‍ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा प्रश्‍न निकाली निघणार आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर ब्रेक बसणार आहे.

स्मार्ट सिटी, नाशिक मनपा आणि पोलीस प्रशासन यांचा एकत्रितरीत्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाने यापूर्वीच मंजूर केला होता. खरेतर सिंहस्थ काळातच या प्रस्तावावर अंमलबजावणी होणार होती. परंतु, त्यासाठी कालावधी कमी राहिल्याने त्यावेळी केवळ सिंहस्थापुरते भाडेतत्त्वावर कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले होते. मात्र, आता स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सीसीटीव्ही बसविण्याची तरतूद असल्याने या योजनेने पुन्हा उचल खाल्ली.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नाशिककरांना आश्‍वासन दिले होते. त्यानंतर लागलीच काही दिवसांमध्येच या प्रकरणी चक्रे फिरत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांबाबतची ई निविदा प्रसिद्ध झाली आहे. आयटी महामंडळाने ही निविदा प्रसिद्ध केली असून, त्या अंतर्गत 3300 कॅमेरे शहरासह परिसरात बसविले जाणार आहेत. 

त्यासाठी 470 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई, पुणे या महानगरांनंतर नाशिकला अशा प्रकारे उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यात 360 अंशांत फिरणारे कॅमेरे, स्पॉट कॅमेरे व फिरत्या कॅमेर्‍यांचा समावेश असणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. 

स्मार्ट कार्यालयातून नियंत्रण 

पंचवटी विभागीय कार्यालयात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कमांड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. या कार्यालयातून शहरातील सर्वच कॅमेर्‍यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी खास माहिती तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभारली जाणार आहे. या ठिकाणावरून  बारीकसारीक हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.