Tue, Jul 23, 2019 17:18होमपेज › Nashik › राज्यात २०१९ पर्यंत ३० हजार किमी रस्ते

राज्यात २०१९ पर्यंत ३० हजार किमी रस्ते

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 12 2018 11:28PMसिन्‍नर : प्रतिनिधी

ज्यांच्या दारापुढे कधी खडीची एक टोपली पडली नाही, अशा वंचित लोकांसाठी रस्ते केले पाहिजे, हे स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. आता  2019 पर्यंत राज्यभरात 30 हजार किलोमीटरचे रस्ते बांधून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

सिन्‍नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चास-सोनेवाडी या चार कोटी 73 लाख रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण तसेच रेणुकामाता मंदिर परिसर व तलाव सुशोभीकरण, लोकनेते 
गोपीनाथ मुंडे स्मारक (3.70 कोटी) तसेच नांदूरशिंगोटे अंतर्गत एक कोटी 17 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, ज्येेष्ठ नेते डी. पी. आव्हाड, बाजार समितीचे माजी सभापती नामदेवराव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, पंचायत समिती सदस्य जगन पा. भाबड, संग्राम कातकाडे, रोहिणी कांगणे, बर्के, हेमंत नाईक, सुदाम नवाळे, सरपंच गोपाळ शेळके, नामदेव सांगळे आदी उपस्थित होते.

ज्याप्रमाणे मुंडे साहेबांचे नाशिक जिल्ह्यावर नितांत प्रेम होते, तसेच माझेही प्रेम या जिल्ह्यावर असल्याचे मोठ्या प्रमाणात निधी देऊन आपण सिद्ध केले असल्याचे सांगून ना. मुंडे म्हणाल्या, राजकारणाच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या वेगाने विकासाची कामे केली पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात वर्षात 1200 किमी अंतराचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. आतापर्यंत 640 किमीचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत. ग्रामविकास खात्याअंतर्गत आपण 350 कोटींची कामे केली आहेत. हे सगळे रस्ते पूर्ण होतील तेव्हा खर्‍या अर्थाने ग्रामीण भागातील वंचित जनता विकासाच्या प्रवाहात येईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रास्ताविकात उदय सांगळे यांनी गत पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेत परिवर्तन घडविण्यात पंकजा मुंडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगताना युती शासनाच्या काळातच स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सिन्‍नरसाठी 200 कोटींच्या प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या योजना मिळाल्याचे सांगितले. तसेच सिन्‍नर हा दुष्काळी तालुका असून, येथील धरणांतील साठा वाढविण्यासाठी तसेच नव्या सिंचन योजनांसाठी ना. मुंडे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.