Wed, Aug 21, 2019 15:28होमपेज › Nashik › नाशिकमध्ये ३.२ रिश्टर स्‍केलचे भूकंपाचे धक्के

नाशिकमध्ये ३.२ रिश्टर स्‍केलचे भूकंपाचे धक्के

Published On: Dec 25 2017 7:19PM | Last Updated: Dec 25 2017 7:19PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर पेठच्या दिशेने सोमवार (दि. 25) सकाळी 9 वाजून 44 मिनिटे आणि 31 सेकंदांनी भूकंपाचे धक्के बसले. मेरीमधील भूकंपमापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या धक्यानंतर दोन छोटे धक्केही जाणवले.

शहरापासून 40 किलोमीटरवर सकाळी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 195 सेकंद जाणवली. पहिला 3.2 रिश्टर स्केलच्या धक्यानंतर काही कालावधीतच 1.3 आणि 1.6 रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. पेठ, हरसुल आणि सुरगाणा भागात या धक्यांमुळे जमीन हादरण्याबरोबरच खिडक्यांचे तावदाने हादरल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, चालू महिन्यात देखील कळवण तालुक्यातील दळवट आणि पंचक्रोशीतील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, त्यावेळी मेरीसह राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही भूकंपमापक यंत्रावर त्याची नोंद झाली नव्हती.

या धक्कयांची तीव्रता अतिशय कमी असून, यामुळे कोणतीही जीवीत वा वित्तहानी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

भुकपांचे केंद्र शोधण्याचे काम सुरू आहे.  भूगर्भात या हालचाली कायम सुरु असतात. केवळ कमी-अधिक तीव्रतेनुसारच या धक्क्यांची तीव्रता नोंदविली जाते. वारंवार असे धक्के जाणवल्यास नागरिकांनी मोकळ्या जागेत स्थलांतरीत व्हावे. तसेच तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांशी तत्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन खेडकर यांनी केले.