Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Nashik › बंंदोबस्तात 26 टँकर नाशिकहून मुंबईला रवाना

बंंदोबस्तात 26 टँकर नाशिकहून मुंबईला रवाना

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:35AMनाशिक : प्रतिनिधी

दुधाला पाच रुपये दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन पुकारलेले असतानाच जिल्ह्यातून सोमवारी (दि.16) दिवसभरात दुधाचे 26 टँकर मुंबईकडे पोलीस बंदोबस्तात रवाना केल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तसेच संकलन केंद्र व संघांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (दि.15) मध्यरात्रीपासून राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. सातारा, कोल्हापूर तसेच मुंबईच्या वेशीवर कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडतानाच प्लास्टिक पिशवीतील बंद दूध रस्त्यावर फेकून दिले. राज्यात एकीकडे आंदोलन पेटलेले असताना जिल्ह्यात मात्र पहिल्या दिवशी आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवला नाही. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिकसह नगर व जळगावमधील दूध उत्पादक संघांची बैठक घेतली. तसेच कोणत्याही आंदोलनांना बळी न पडता काम नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, जिल्ह्यातून दिवसभरात 26 टँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत 22 टँकर तर सायंकाळी साडेसहा वाजता आणखी 4 टँकर असे एकूण 26 टँकर मुंबईकडे रवाना करण्यात आले. तसेच दूध उत्पादक शेतकरी तसेच संघ व संकलन केंद्रांना आंदोलन काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे. मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच ग्रामीण पोलीस आयुक्तालयात संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. काही समस्या असल्यास मदतीसाठी या नियंत्रण कक्षात अन्यथा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. 

एक लाख 30 हजार लिटरचे संकलन

नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यात 47 मोठे दूध उत्पादक संघ असून, यातील 13 संघ हे नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. जिल्ह्यात दररोज एक लाख 30 हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. जिल्ह्यात सिन्नर तालुका, महालक्ष्मी, क्षीरसागर डेअरी फार्म, साईकृपा हे सर्वाधिक दूध संकलन करणारे केंद्र आहेत. एकूण संकलित होणार्‍या दुधापैकी 50 हजार लिटर दूध वितरित केले जात असून, उर्वरित दूध मुंबईला पाठविण्यात येते.