Mon, Jul 22, 2019 02:51होमपेज › Nashik › 257 कोटींच्या रस्ते कामांना लागणार ब्रेक

257 कोटींच्या रस्ते कामांना लागणार ब्रेक

Published On: Feb 14 2018 1:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:51PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाचा धडाका पाहता धास्तावलेल्या अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी 257 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा नादच सोडून दिला आहे. यामुळे या सर्वच कामांना ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामांसाठी तरतूद नसल्याने त्यासाठी निधी कसा दाखवायचा, असा प्रश्‍न लेखा विभागाला पडल्याने या विभागानेही ही फाइल दूर सरकून दिली आहे. 

सत्तारूढ भाजपाने महासभेत मागल्या दाराने जादा विषयांत 257 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यास विरोधी पक्षांनी हरकत घेत संबंधित प्रस्ताव महासभेत पुन्हा चर्चेसाठी सादर करा, अशी मागणी केली होती. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी असून, त्यात चुकीच्या रस्त्यांची कामे धरण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी तसेच सत्तारूढ पक्षातील काही नगरसेवकांनी केला होता. त्यावर प्रशासनाने रस्त्यांच्या नावांची संपूर्ण यादीच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. त्यातून विरोधकांचेही समाधान झाल्याने त्यांनी पुन्हा या रस्त्यांना विरोध करण्याचा नादच केला नाही. प्रशासनानेही आधी 217 कोटी आणि त्यानंतर 37 कोटींच्या रस्त्यांची निविदा प्रसिद्ध करत या कामांना हात घातला. त्यासाठी येत्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येणार होती. परंतु, ही तरतूद होण्यापूर्वीच मनपा आयुक्‍तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांच्या हाती आल्याने निविदा प्रक्रिया थंडावली आहे.

मुंढे यांच्या कामकाजाची धास्ती घेऊन पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनीही आपल्या तलवारी म्यान करत 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे नावही घेणे बंद केले आहे. आधी यातीलच काही पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणत फाइल मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यात ते यशस्वीही झाले होते. परंतु, आता मुंढे यांच्यामुळे सर्वच थंड झाले असून, या रस्त्यांना तरतूद कुठून दाखवायची, असा प्रश्‍न वित्त व लेखा विभागाला पडला आहे. स्पीलओव्हरमध्ये या रस्त्यांची किंमत धरल्याने मनपाचे सध्याचे उत्तरदायित्व सुमारे 854 कोटींपर्यंत पोहोचले आहे.

हा आकडा पाहून खुद्द आयुक्‍त मुंढे यांनीदेखील आश्‍चर्य व्यक्‍त केले असून, निधीची तरतूद आणि कामांची उपयुक्‍तता व गरज पाहूनच कामे मंजूर करण्यात यावे, अशी तंबीच आयुक्‍तांनी अधिकार्‍यांना दिली आहे. यामुळेच आता या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.