Mon, May 20, 2019 22:16होमपेज › Nashik › कृत्रिम पावसाच्या प्रयोगात 250 कोटी जाणार ‘ढगात’

कृत्रिम पावसाच्या प्रयोगात 250 कोटी जाणार ‘ढगात’

Published On: Jul 04 2018 2:17AM | Last Updated: Jul 03 2018 11:09PMनाशिक : रवींद्र आखाडे 

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था अर्थात, ‘आयआयटीएम’मार्फत सोलापूर येथे यंदा कृत्रिम पावसाचा ‘प्रयोग’ केला जाणार आहे. यासाठी सोलापूरमध्ये कृत्रिम पावसाचे केंद्र उभारले जाणार असून, त्यासाठी तब्बल 250 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुळात, देशात आजवर करोडो रुपये खर्च करून केलेला एकही प्रयोग यशस्वी झालेला नसताना आणि सोलापूर हा अवर्षणग्रस्त विभाग असूनही येथे हा अनाठायी खर्चाचा अयशस्वी प्रयोग कशासाठी केला जात आहे, असा सवाल काही तज्ज्ञांसह सोलापूरवासीयांनी केला आहे. या प्रयोगातून केवळ पैशांचा चुराडा होणार असून, पाऊस तर पडूच शकणार नाही, असा दावाही या तज्ज्ञांनी केला आहे.

विमानांचा वापर धोकादायक

सध्याच्या अस्थिर वातावरणात ढगात जाऊन त्यांची निरीक्षणे घेणे हे अत्यंत धोकादायक काम आहे. अशा काळात विमानांचा वापर हे अपघाताला निमंत्रण देण्याचे कारणदेखील होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेण्यात येणार असून, या प्रयोगासाठी कोट्यवधी रुपयेदेखील मोबदल्यात द्यावे लागणार आहेत. सोलापूरच्या प्रयोगात सिल्व्हर आयोडाईड हे विषारी रसायन वापरले जाणार असून, यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग बंद करण्यात आले आहेत. 

प्रत्यक्षात दोन मि.मी.देखील पावसाची नोंद झाली नाही

2015 मध्ये मराठवाड्यात केलेल्या प्रयोगातून जवळपास 200 मि.मी. पाऊस त्या भागात पडल्याची नोंद कंपनीने केली होती. प्रत्यक्षात मात्र  प्रयोगासाठी वापरण्यात आलेली पद्धत व साधनसामग्रीच चुकीची असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या भागामध्ये दोन मि.मी.देखील पावसाची नोंद झाली नव्हती, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

अनुकूल वातावरण अन् जागेच्या मर्यादा

महाराष्ट्र राज्यातील वातावरण हे कृत्रिम पावसासाठी योग्य नसून, या प्रयोगासाठी जागेच्या मर्यादाही आहेत. राज्यात 2015 मध्ये प्रयोग होत असलेल्या ठिकाणापासून 50 किलोमीटरच्या परिघात पाऊस पाडण्याचा दावा प्रयोगकर्त्या कंपनीने केला होता. मात्र, राज्यातील सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांचा विचार करता हा प्रयोग निव्वळ धूळफेक आहे. त्यावेळी प्रयोगात वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीने 10 किलोमीटरच्या परिघात पाऊस पडण्याची सूतराम शक्यता नव्हती. मुळातच ज्या ठिकाणी असे प्रयोग केले जातात, तेथून जवळपास 50 किलोमीटरच्या परिघात डोंगर, दर्‍या, मोठ्या इमारती नसाव्यात, असे विज्ञान सांगते. मात्र, राज्यात याउलट परिस्थिती आहे, म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे.   सोलापूरमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यासाठी सर्वप्रथम एक जून ही तारीख निश्‍चित करण्यात आली. मात्र, तेव्हा प्रयोग होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा एक जुलै ही तारीख निश्‍चित करण्यात आली. या प्रयोगाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची तारीखच मिळत नसल्याने प्रयोगाला अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही.

कुतूहल आणि भीतीही

सोलापुरात कृत्रिम पावसाची जोरदार तयारी सुरू असून, यासाठी सी-बँड रडार लावले जाणार आहे. या प्रयोगासाठी दोन स्वतंत्र विमाने वापरली जाणार आहेत, पैकी एक ढगांचा वेध घेणार आहे, तर दुसरे ढगात अग्‍निबाण सोडणार आहे. ही दोन-दोन विमाने का उडविली जाणार आहेत, याबद्दलदेखील नागरिकांच्या मनात कुतूहल आणि अपघात झाला तर काय करायचे, याची भीतीदेखील आहे.