Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Nashik › मनमाडजवळ जेवणातून 25 जणांना विषबाधा

मनमाडजवळ जेवणातून 25 जणांना विषबाधा

Published On: Apr 30 2018 2:05AM | Last Updated: Apr 29 2018 11:00PMमनमाड : वार्ताहर

धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून सुमारे 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी सायंकाळी अंकाई गावात घडली. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या 20 रुग्णांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना येवला व इतर ठिकाणी दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये त्यात एक लहान मुलगा व एका महिलेचा समावेश आहे.

मनमाडपासून 5 किमी अंतरावर असलेल्या अंकाई गावातील पोपट वाळूबा आहेर व त्यांच्या घरातील मंडळी काशी येथे देवदर्शन व तीर्थयात्रेला गेले होते. तिर्थयात्रेवरून आले असता रविवारी आहेर यांच्या घरी काशीचे पाणी मिरविण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आहेर यांचे नातलग व पंचक्रोशीतील आप्तगन उपस्थित होते. दुपारनंतर धार्मिक कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमामध्ये आहेर यांनी आलेल्या पाहुण्यांना सायंकाळी गुलाब जाम, मठ्ठा, वरण भात, पुरी भाजी असे जेवण दिले. जेवण केल्यानंतर काही वेळातच मळमळ होऊन उलट्या, जुलाब सुरू झाले. सुमारे वीस ते पंचवीस लोकांना विषबाधेचा त्रास होऊ लागल्याने या सर्वांना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तुकाराम वैद्य, मयूर तुकाराम वैद्य, दत्तू जाधव, बंटी पळसकर, सुखदेव जाधव, मंजुळबाई आहेर, नवनाथ वैद्य, दिनेश रंगनाथ वाघ, विर्यभान विलास वाघ, बाळू चंद्रभान ठाकरे, अजय सुभाष ठाकरे, जेवण तयार करणारे आचारी माधव नामदेव शिंदे आदींवर डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येवला तसेच इतर ठिकाणच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.