Mon, Nov 19, 2018 21:06



होमपेज › Nashik › सप्तशृंगगडासाठी 25 कोटी

सप्तशृंगगडासाठी 25 कोटी

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:57PM



कळवण : बापू देवरे

उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगगडाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करीत असून, भविष्यातही अधिक  निधी उपलब्ध करून देऊ व नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटन हब निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सप्तशृंगी गड येथे देशातील पहिल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,  खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दिपीका चव्हाण, आमदार सिमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार पंकज भुजबळ, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, सुनील बागुल, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सप्तशृंगी गड येथे देशातील पहिला फ्यूनिक्यूलर रोप-वे प्रकल्प सर्व सोयी-सुविधांयुक्‍त आहे. बांधकाम विभागाने चांगली वास्तू उभारून  या भागाच्या धार्मिकबरोबरोच पर्यटन विकासाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करूनदिली आहे. नाशिक जिल्हा तसा विविध गुणसंपन्न बरोबरच धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. आजचा दिवस भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असून, दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी  ट्रॉली उपयुक्‍त ठरणार असल्याचे गौरवोद‍्गार फडणवीस यांनी काढले.

माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की मी स्वित्झर्लंड येथे गेलो असता तेथील फ्यूनिक्यूलर रोप-वे बघितला. असा प्रकल्प आपल्या राज्यात, नाशिक जिल्ह्यातही असावा, अशी इच्छा व्यक्‍त केली आणि सप्तशृंग गडावर नऊ वर्षांपूर्वी त्याची मुहूर्तमेढ रोवली. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. यावेळी भुजबळांनी नाशिक शहरातील गोदा बोट प्रकल्प व मांजरपाड्याचे राहिलेले काम पूर्ण करून त्याचे पुण्यकर्म पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घ्यावे, असे आवाहन केले.

ना. भुसे म्हणाले की, सप्तशृंग गडाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून, गडावरील विविध विकासकामांच्या 25 कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यास तत्काळ मंजुरी द्यावी व पंढरपूर धर्तीवर खान्देशातून पायी चालत येणार्‍या भाविकांसाठी निर्मल वारीसाठी निधी द्यावा व सप्तशृंगी गड येथील वनजमिनीबाबत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असे सांगितले.ना. महाजन म्हणाले, की फ्यूनिक्यूलर रोपवे उदघाटन सोहळ्यास उशीर झाला असला तरी भावीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध खात्याच्या सर्वच परवानग्या मिळाल्यानंतर आज प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. ना. भुजबळ यांच्या मागणीनुसार मांजरपाडा प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागणार आहे. पुढील पावसाळ्यात प्रकल्पातील पाणी अडवून मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच प्रकल्पाचे उदघाटन करू, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

यावेळी सुयोग गुरुबक्षणी फ्यूनिक्यूलर रोप-वेचे संचालक राजकुमार गुरुबक्षणी,   शिवशंकर लातूरे, राजू लुम्बा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, अध्यक्ष श्रीमती यू. एन. नंदेश्‍वर, विश्‍वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, नाना सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सत्कार केला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सूमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, गिरीश गवळी, जगन बर्डे, गणेश बर्डे, ललिता व्हरगळ, ग्रामसेवक आर. बी. जाधव आदींनी सत्कार केला.