Fri, May 24, 2019 09:30होमपेज › Nashik › अमळनेरच्या नगराध्यक्षांसह २३ नगरसेवक अपात्र

अमळनेरच्या नगराध्यक्षांसह २३ नगरसेवक अपात्र

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:08AMजळगाव : प्रतिनिधी

अतिक्रमण मोहिमेस नियमबाह्य स्थगिती दिल्याप्रकरणी अमळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्यासह 23 नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर हा निर्णय भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शहरातील वाढते अतिक्रमण काढण्यासाठी जनभावना तीव्र असताना नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या गटाच्या 23 नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण मोहिमेस स्थगिती दिली होती.

याबाबत आमदार शिरीष चौधरी गटाचे नगरसेवक प्रवीण पाठक यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून या नागरसेवकांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी केली होती. या दरम्यान, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला होता. शहर विकासात अडथळे नकोत म्हणून भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते. परंतु, आमदार शिरीष चौधरी यांनीही जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन अतिक्रमण मोहिमेस नियमबाह्य स्थगिती देणार्‍या नगरसेवकांना अपात्र घोषित करावे यासाठी पाठपुरावा केला होता.  

दरम्यान, नगरसेवक अपात्र ठरतील याची जाणीव होताच माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता. समर्थक नगरसेवक व नगराध्यक्षा पत्नीचे पद वाचावे यासाठीच साहेबराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात होते. तर दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी अमळनेरच्या नगराध्यक्षा व त्यांच्या समर्थक नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता.