Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Nashik › जिल्ह्यात वाढणार २२० मतदान केंद्रे  

जिल्ह्यात वाढणार २२० मतदान केंद्रे  

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 30 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या फेररचनेत 220 मतदान केंद्रे नव्याने वाढणार आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता चार हजार 448 वर पोहोचणार आहे. दरम्यान, केंद्र वाढविण्याबाबतचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात मतदारयाद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. तर दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरी भागातील मतदान केंद्रासाठी 1400 तर ग्रामीण भागातील केंद्रासाठी 1200 मतदारांची मर्यादा ठरवून देण्यात आली. या मर्यादेपेक्षा अधिकचे मतदार असल्यास नवीन केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 

निवडणूक शाखेने जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांतील चार हजार 228 मतदान केंद्रांचे सर्वेक्षण केले. यात मर्यादेपेक्षा काही ठिकाणी मतदारांची संख्या जास्त असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यानुसार प्रशासनाने संबंधित केंद्रांची पुनर्रचना केली. या पुनर्रचनेत तब्बल 220 मतदान केंद्रांची नव्याने भर पडली आहे. तर 140 मतदान केंद्रांची जागा हलविण्यात आली. तसेच इगतपुरी मतदारसंघातील 15 केंद्रांची नावे बदलण्यात आली. दरम्यान, 701 केंद्रांवरील अधिकचे मतदार हे दुसर्‍या केंद्रावर पाठविण्यात आले असून, जेथे मतदारसंख्या कमी आहे, अशी केंद्रे नजीकच्या दुसर्‍या केंद्राला जोडण्यात आली.

मतदान केंद्र पुनर्रचनेत चांदवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 नव्या मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्या खालोखाल सिन्नरमध्ये 30 तर येवल्यात 24 केंद्रे वाढली आहेत. नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ मिळून 30 नवे केंद्रे उदयास आली आहेत. पुनर्रचनेत 220 मतदान केंद्रे वाढल्याने राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे. 

कंट्रोल, बॅलेट युनिटसाठी टीम बंगळुरूला रवाना

जिल्ह्यासाठी लागणारे नवीन कंट्रोल आणि बॅलेट युनिट घेण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेची टीम बंगळुरू येथे रवाना झाली आहे. बंगळुरू येथील इलेक्शन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड या आयोगाला साहित्य पुरविणार्‍या कंपनीतून हे युनिट प्राप्त होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी पाच हजार 489 कंट्रोल, तर 9422 बॅलेट युनिट मिळणार आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स निवडणुकीच्या वेळेस उपलब्ध होतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

नवे मतदान केंद्रे अशी..

नांदगाव : 10, मालेगाव मध्य : 05, मालेगाव बाह्य : 09, बागलाण : 17, कळवण : 15, चांदवड : 33, येवला : 24, सिन्‍नर : 30, निफाड : 08, दिंडोरी : 19, नाशिक पूर्व : 04, नाशिक मध्य : 06, नाशिक पश्‍चिम : 12, देवळाली : 08, इगतपुरी : 20.