Wed, Mar 20, 2019 08:51होमपेज › Nashik › झणझणीत मिरचीचा ठसका ‘गोड’!

झणझणीत मिरचीचा ठसका ‘गोड’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येवला : प्रतिनिधी

भाजीपाला असो वा कोणतेही पीक, ते  पिकवायचे म्हटले तर विक्री दरात होणारे नेहमीचे प्रचंड चढ-उतार हे शेतकर्‍याला कायमच अनुभवायला मिळत असतात. यामुळे काही वेळा तोटा, तर काही वेळा फायदा असे चक्र शेतकर्‍याभोवती सुरूच असते. मात्र, जास्त काळ चालणारे पीक टप्पाटप्पाने केले, तर या चढ-उताराचा फायदा कसा घेता येतो, हे येवला तालुक्यातील कातरणीच्या गोरख ठाकरे या शेतकर्‍याने दाखवून दिले आहे. ऑगस्ट महिन्यात लावलेल्या आठ एकर मिरचीतून त्यांना आतापर्यंत 22 लाख रुपये मिळाले असून, अजून दहा लाख रुपयांच्या वर असे एकूण 30 ते 32 लाख रुपयांचे उत्पन्‍न मिरची देईल, असा विश्‍वास त्यांना वाटतो आहे.

दुष्काळी परिस्थिती असलेल्या येवला तालुक्यातील कातरणी येेथे ठाकरे या शेतकर्‍याने ऑगस्ट महिन्यामध्ये आठ एकरांत मिरचीची लागवड केली. लागवडीसाठी उगाव येथून खासगी नर्सरीतून झणझणीत मिरचीची रोपे आणली. तत्पूर्वी त्यांनी आठ एकरावर सव्वाचार फूट अंतरावर सरी पाडून त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादनही केले. 

सव्वाचार फूट अंतराच्या सरीवर सव्वा फुटाच्या अंतरावर एक मिरचीचे रोप, अशी एकरी आठ हजार रोपांची लागवड करण्यात आली. आठ एकर क्षेत्रावर सुमारे चौसष्ट हजार मिरचीची रोपे त्यांना लागली. एक रुपया प्रतिरोप याप्रमाणे त्यांना खर्च आला. अशी तीन एकर क्षेत्रावर तेजा व पाच एकर क्षेत्रावर नंदिता या निर्यातक्षम मिरचीच्या वाणाची लागवड ठाकरे यांनी केली. या संपूर्ण क्षेत्रावर त्यांनी ठिबक सिंचन केले असून, पाणी देण्याचे नियोजन शक्य झाले आहे. मल्चिंगमुळे निंदणीचा खर्च तर वाचला; पण बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही टळला, असे ठाकरे सांगतात.

मजुरांचा प्रश्‍नही सुटला!

सध्या शेतीला भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे मजूर. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी ठाकरे यांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून मजूर आणले. त्या मजुरांना मिरची तोडणीचे काम किलोप्रमाणे ठरवून दिल्याने कामाचा वेगही वाढला गेला. मिरची तोडणी, प्रतवारी, पॅकेजिंग असे एका किलोला चार रुपयांपर्यंत मजुरी ठाकरे देत असतात. फवारणीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाकरे यांनी मिरची प्लॉटमध्ये ठराविक अंतरावर दोन सरींतून ट्रॅक्टर जाईल, असे अंतर ठेवले आहे. त्या ट्रॅक्टरला असलेल्या फवारणी यंत्राच्या नळीला उंच पाइप जोडून एकाच वेळी आठ ते दहा नोझल व तितकेच मजूर फवारणी करतील, अशी व्यवस्था केल्याने औषधाची बचत होऊन वेळेची बचतही ठाकरे यांनी केली.

दररोज पावणेदोन टन मिरचीचा तोडा

मिरची लावल्यानंतर ती साधारण साठाव्या दिवशी म्हणजेच दोन महिन्यांनी पहिली तोडणी झाली. नाशिकसह नाशिकचे स्थानिक मार्केट, ओझर, कोपरगाव, मनमाड असे जेथून मागणी येईल तेथेे वेळोवेळी माल पाठवून ठाकरे यांनी मिरची विक्री केली आहे. साधारण 17-18 रुपये किलोपासून 30 रुपये किलोपर्यंत त्यांनी ठोक भावात मिरची विकली असून, दररोज साधारण दीड ते पावणेदोन टन मिरचीचा तोडा त्यांच्याकडे चालू आहे. आतापावेतो ठाकरे यांनी 100 टनांच्या आसपास मिरचीची विक्री केली असून, त्यास सरासरी 22 ते 25 रुपये किलो भाव मिळत आठ एकरांतून 22 लाख रुपयांचे उत्पन्‍न मिळवले आहे. अजून ठाकरे यांना 10-12 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित असून, आठ एकरावर ठिबक वगळता त्यांनी आठ लाखांच्या आसपास खर्च केलेला आहे. साधारण एकरी खर्च एक लाख, तर उत्पन्‍न चार लाख मिळण्याची आशा  ठाकरेंंना आहे.