Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Nashik › समृद्धीसाठी 213 हेक्टरचे सक्‍तीने होणार भूसंपादन

समृद्धीसाठी 213 हेक्टरचे सक्‍तीने होणार भूसंपादन

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:12AMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील 168 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहणाचे काम रखडले आहे. त्यामुळे या क्षेत्राचे सक्तीने भू-संपादन होणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 14 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले असून, ही टक्केवारी 80 टक्क्यांच्यावर आहे. दरम्यान, कोपरगावमधील 10 गावांतील 58 गटांमधील 45.23 हेक्टरचे सक्तीने भूसंपादन होणार आहे. 

राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी प्रकल्पासाठी दहा जिल्ह्यांमधील जमीन अधिग्रहीत केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर व इगतपुरी तालुक्यात जमीन अधिग्रहणाचे काम केले जात आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने 16 विभाग केले असून, त्यापैकी 13 कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांमधील जमीन अधिग्रहणाचे काम बाकी आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यातील 20 टक्के जमीन अधिग्रहण झालेले नाही. यामध्ये सिन्नर तालुक्यातील 25 गावांमध्ये 403 गटांमधील 136.59 हेक्टरचे जमिनीचे सक्तीने संपादन होणे बाकी आहे.

महामार्गावरून इंटरचेंज करण्यासाठी गोंदे येथील 26 गटांतील 22.91 हेक्टर जमीन लागणार आहे. तसेच, इगतपुरीतील पेसा क्षेत्र वगळून इतर वर्ग -1 च्या जमिनींपैकी 27 गटातील शेतकर्‍यांमध्ये वाद आहे. त्यामुळे 10.56 हेक्टर क्षेत्र संपादित करणे बाकी आहे. त्यामुळेच आत्ता यासर्व क्षेत्र हे भू-संपादन कायद्यानुसार केले जाणार आहे. 

सक्तीने भू-संपादन करावयाच्या क्षेत्राची गटनिहाय माहिती जिल्हा प्रशासनाने एमएसआरडीसीला सादर केली आहे. एमएसआरडीसीने याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर हे संपादनाचे काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी जमीन देण्यास सहमती दर्शविणार्‍या शेतकर्‍यांची जमीन थेट खरेदीद्वारे घेतली जाईल, असे उपजिल्हाधिकारी तथा समृद्धी प्रकल्प जिल्हा समन्वयक विठ्ठल सोनवणे सांगितले.