Wed, Nov 21, 2018 05:10



होमपेज › Nashik › बुराई नदी बारमाही करण्यासाठी २० कोटी 

बुराई नदी बारमाही करण्यासाठी २० कोटी 

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:01AM



धुळे : प्रतिनिधी 

साक्री व शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 कोटी 15 लाख  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून बुराई नदीवर 34 बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 24 बंधार्‍यांचे भूमिपूजन येत्या चार दिवसांत करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

मंत्री  रावल यांनी आजपासून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरवात केली आहे. या परिक्रमेचा शुभारंभ साक्री तालुक्यातील दुसाणे गावापासून झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदखेडाच्या नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, शिंदखेडा पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी शिसोदे, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, तहसीलदार संदीप भोसले (साक्री), सुदाम महाजन (शिंदखेडा) आदी उपस्ति होते. तत्पूर्वी मंत्री  रावल यांच्या हस्ते बुराई नदीवर बांधण्यात येणार्‍या दोन बंधार्‍यांचे भूमीपूजन करण्यात आले.

मंत्री  रावल म्हणाले की, अवर्षण प्रवण भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बुराई नदी बारमाही प्रवाहित व्हावी हे स्वप्न आपण पाहिले होते. ते आता साकारत आहेत.  बुराई नदी परिक्रमेत एकूण 24 बंधार्‍यांचे भूमीपूजन होवून त्यांच्या कामास तत्काळ सुरवात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बुराई नदी परिसरातील विहिरींची  भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल.तसेच परिसरातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. माा ते पाया दरम्यान बुराई नदीवर हे बंधारे बांधण्यात येतील. 

त्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व आगामी काळात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जल पुनर्भरण होण्यास मदत होईल.असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 12 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

बुराई नदी परिसराचा सर्वांगीण विकासासाठी जल, जंगल, जमिनीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. या परिसरात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, असे बारीपाडा येील चैत्राम पवार यांनी सांगितले. यावेळी बबन चौधरी, श्रीमती शिसोदे, संजय बच्छाव आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नागरिक उपस्थित होते.