Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Nashik › मुंबईतून सव्वादोन किलो ‘एमडी ड्रग्ज’ जप्‍त

मुंबईतून सव्वादोन किलो ‘एमडी ड्रग्ज’ जप्‍त

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:41PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकच्या तिघा तरुणांकडून 265 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्‍त केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून दोघांकडून 44 लाख रुपयांचे दोन किलो 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्‍त केले आहेत. संशयित जॅग्वार या आलिशान कारमधून ड्रग्जची वाहतूक करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारही जप्‍त केली आहे. 

16 मे रोजी पाथर्डी फाटा येथे एमएच 15 ईक्यू 5005 क्रमांकाच्या सफारी कारमधून रणजित गोविंदराव मोरे (32, रा. पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (31) आणि नितीन भास्कर माळशेदे (32, दोघे रा. आडगाव शिवार) या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे 265 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 10 लाख रुपयांची सफारी कार असा 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांचीही पोलीस कोठडीत चौकशी सुरू असताना पोलिसांना मुंबईतील काही संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन विभागांत सापळा रचून संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथून नदीम सलीम सौरठिया (30, रा. नागपाडा, मुंबई) आणि सफैउल्ला फारुख शेख (23, रा. मीरारोड, मुंबई) या दोघांना 44 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह अटक केली. त्यांच्याकडून 80 लाख रुपये किमतीची एमएच 02 डीएन 5050 क्रमांकाची जॅग्वार कार जप्‍त केली आहे. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी चार दिवसांत पाच संशयितांना अटक करून त्यांच्याकडून  50 लाख रुपयांचे सुमारे अडीच किलो एमडी ड्रग्ज जप्‍त केले आहे.

पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्‍त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे संजय मुळक, वसंत पांडव, पोलीस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, विशाल काठे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, संतोष कोरडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

ड्रग्जसह गावठी कट्ट्यांचीही विक्री 

एमडी ड्रग्जसह अटक केलेल्या रणजित मोरे हा ड्रग्ज विक्रीसोबतच गावठी कट्ट्यांचीही विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजित मोरे याने शहरात अनेकांना गावठी कट्टे विक्री केले असून, कट्टे विकत घेणार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यात निगेहबान इम्तियाज खान (रा. टिटवाळा), दीपक राजेंद्र जाधव (रा. पंचवटी), अमोल भास्कर पाटील (रा. म्हसरूळ टेक) यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी तिघांकडून पोलिसांनी सात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुसे असा दोन लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. या प्रकरणी भद्रकाली, इंदिरानगर, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार चालू वर्षात जानेवारी ते 18 मे दरम्यान 17 गुन्हे दाखल केले असून, त्यात 28 गावठी कट्टे जप्‍त केले. तसेच 33 संशयितांना अटक केली असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे एमडी ड्रग्ज?

‘मेथॅलिनी डिऑक्सीमेथॅम्पेटामाइन’ अर्थात एमडी नावाने हा ड्रग्ज नशेबाजांना पुरवण्यात येतो. एक ग्रॅम वजनाच्या एमडीचे तीन ते चार डोस करून ते घेतल्यानंतर चार दिवसांपर्यंत त्याची नशा कायम राहते. नशा केल्यानंतर भूक लागत नाही. काही खाल्ले तरी पचत नसल्याने नशेच्या अमलात असलेली व्यक्‍ती पाणी पिते. त्याचप्रमाणे दातांमधून आवाज येणे, मांसपेशी अवघडणे, जास्त घाम निघण्यासोबतच शरीराचे तापमान वाढण्याचे लक्षण तात्पुरत्या परिणामांची असतात. तर ओव्हरडोस झाल्यास उच्च रक्‍तदाब, चक्कर येणे, हृदयविकाराचा झटका, शरीराला सूज येणे आदी लक्षणे दिसून येत असतात. त्याचप्रमाणे या ड्रग्जचे व्यसन लागल्यानंतर त्याचे सेवन करण्यासाठी नशेबाज व्यक्‍ती कोणत्याही थरास जाण्यास तयार होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे.