Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Nashik › लासलगावी डिसेंबर महिन्यात १९४ कोटींची उलाढाल!

लासलगावी डिसेंबर महिन्यात १९४ कोटींची उलाढाल!

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:50PM

बुकमार्क करा
लासलगाव : वार्ताहर

शेतीमालाची आवक वाढली की भाव गडगडतात ही आजवरची परिस्थिती असली तरी यंदाचे वर्ष मात्र याला अपवाद ठरले आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असताना बाजारभाव टिकून राहिल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सप्टेंबर 2015 मध्ये लाल कांद्याला 3800 रुपये भाव मिळाला होता. तब्बल दोन वर्षानंतर लाल कांद्याला डिसेंबर महिन्यात 4000 रुपये प्रति क्‍विंटल भाव मिळाले होते. वर्षाच्या पहिल्या महिन्यात सरासरी 3000 हजार रुपये प्रती क्‍विंटल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून एकाच महिन्यात शेतकर्‍यांना 194 कोटी मिळाले आहे.

कांदा आवक वाढत असताना कांद्याच्या भावाची पातळी टिकून आहे. साधारणपणे 2500 ते 2700 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. आता भाव पडू नये, यासाठी सरकारने निर्यातबंदीसारख्या धोरणाचा विचार करु नये, अशी अपेक्षा कांदा उत्पादक करीत आहेत.  लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व आवारावर  डिसेंबर 2017 मध्ये एकाच महिन्यात तब्बल 240 कोटी रुपयांची सर्व शेतीमालाची उलाढाल झाली आहे. फक्‍त लाल कांदा विक्रीतून सुमारे 194 कोटी 30 लाख रुपयांची प्रचंड उलाढाल झाली आहे. आजवरच्या इतिहासात डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त उलाढाल बाजार समितीत झाली असून, शेतकरी वर्गाबरोबर लासलगाव बाजार समितीला सुगीचे दिवस आले आहेत. दोन ते तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील कांदा व धान्य उत्पादकांना पाहिजे, असा भाव मिळू शकलेला नाही. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटामुळे अनेकवेळा शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्यात आला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस कांदाचा भावात सुधारणा होण्यास सुरुवात झाली डिसेंबर महिन्यात 3000 पर्यंत भाव  पोहोचले होते. जानेवारी महिन्यात कांदा तीन हजाराचा टप्पा ओलांडून पुढे सरकला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण बाजार भावाच्या दराबाबत आहे.

दोन महिन्यापासून लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्याचेही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीच्या आवारातदेखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.