Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Nashik › मराठा आंदोलकांनी घेतले स्‍वत:ला अटक करून 

मराठा आंदोलकांनी घेतले स्‍वत:ला अटक करून 

Published On: Aug 08 2018 6:38PM | Last Updated: Aug 08 2018 6:38PMधुळे : प्रतिनिधी 

भाजप खासदार डॉ. हीना गावित यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून फरार दाखविण्यात आलेले धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे १७ आंदोलक आज  शहर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. आंदोलनस्थळापासून पदयात्रा काढून हे सर्व कार्यकर्ते पोलिस ठाण्यात पोहोचले. या सर्वांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायमुर्ती क्षिरसागर यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, धुळयाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू असून या अंतर्गत लोकप्रतिनिधींच्या गाडया अडवून आंदोलन सुरू झाले. यावेळी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावीत या नियोजनाच्या बैठकीतून बाहेर जाण्यासाठी निघाल्या असातना पोलिस आणि आंदोलकांमध्ये प्रवेशव्दार उघडण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी पोलिसांनी प्रवेशव्दावर उघडल्याने अचानक काही तरूण गावीत यांच्या गाडीवर चढले. यातून गाडीची तोडफोड झाली. यानंतर हिना गावीत यांनी  एकूण २२ आंदोलकांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न, तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिल्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनेश ओमप्रकाश आटोळे, अमोल हनुमंत मराठे, अमोल रामदास मराठे, कुणाल पवार या चौघांना पोलिस ठाण्यात हजर केले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयात बाजू मांडतांना पोलिस प्रशासनाने उर्वरीत १८ जणांना फरार दाखवण्यात आल्याची माहिती आंदोलकांना मिळाल्याने त्यांनी स्वत: पोलिस ठाण्यात हजर रहाण्याचे ठरविले. त्यानुसार आज क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, नाना कदम, बापू मराठे, सचिन मराठे, आबा कदम, प्रदीप जाधव, रवींद्र शिंदे, उल्हास यादव, अजित गिडमे, अरुण पवार, हेमंत भडक, रजनीश निंबाळकर, निंबा पाटील, अर्जुन पाटील, राजू महाराज मराठे, संदीप विनायक शिंदे, सुयोग मोरे यांच्यासह सुमारे तीनशे कार्यकर्ते आंदोलनस्थळापासून पायी पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे तसेच पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना आंदोलकांनी सर्व आंदोलक अटक करून घेण्यासाठी आल्याचे सांगीतले. मात्र, आता केवळ १८ आरोपी असल्याने त्यांना अटक केली जाणार असल्याचे सांगीतल्याने हजर असणारे १७ जण स्वत: पोलिसांच्या स्वाधिन झाले. यानंतर यासर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. क्षिरसागर यांनी त्‍यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.