Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Nashik › बोंडअळीग्रस्तांना १७० कोटी मंजूर

बोंडअळीग्रस्तांना १७० कोटी मंजूर

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 05 2018 11:49PMधुळे : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 170 कोटींची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी 135 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात 43 लाखांच्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य झाल्याचा दावादेखील यावेळी करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, डी. एस. अहिरे, कांशीराम पावरा, कुणाल पाटील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल रेखावार, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे यांनी सांगितले, की राज्य शासनाने जिल्ह्यातील 82 हजार 740 शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 408 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला आहे. रोहयो व पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले, की जिल्ह्यातील 1 लाख 98 हजार 263 शेतकर्‍यांचे 1 लाख 98 हजार 504 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून, बोंडअळीमुळे नुकसान भरपाई म्हणून 170 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन हप्त्यात शासनाकडून 135 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तो संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित 35 कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार सरसकट भरपाई देण्यात येईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले. तसेच, बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने विविध माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
बोंडअळीबाबतचा प्रश्‍न आमदार अनिल गोटे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता.