Thu, Jun 27, 2019 02:25होमपेज › Nashik › नाशिकरोडला १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

नाशिकरोडला १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 20 2018 12:02AMनाशिकरोड : वार्ताहर

येथील जेडीसी बिटको शाळेतील सुमारे पंधरा विद्यार्थ्यांना ज्यूस प्यायल्याने विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (दि.19) घडली. प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त मुलांना बिर्ला रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. मात्र, पालकांचा आक्रोश पाहून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेला टाळे ठोकून काढता पाय घेतला. या प्रकरणी अद्याप संबंधित ज्यूस कंपनीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मागील काही दिवसांपासून शाळेत एका खासगी ज्यूस कंपनीच्या मार्केटिंग करणार्‍या कर्मचार्‍यांनी आम्ही कंपनीच्या  जाहिरातीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ज्युस वाटप करत आहोत. आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील ज्युस वाटप केला आहे. तुम्हीही विद्यार्थ्यांना ज्युस वाटपास परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्या कंपनीच्या लोकांच्या आग्रहाखातर शाळेने परवानगी  दिली.

त्याप्रमाणे दुपार सत्रातील इयत्ता पाचवी आणि सहावी मधील विद्याार्थ्यांना ज्युस वाटप केला. ज्युस घेतल्यानंतर साधारणपणे सायंकाळी 5 वाजेेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना उलट्यांचा होण्यास सुरवात झाली.एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शाळेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी शाळेच्या समोर असणार्‍या बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थ्यांना दाखल केले.

यादरम्यान शाळा सुटण्याची वेळ होऊन गेली होती. मुलगा, मुलगी घरी परत आले नसल्याने पालकांनी शाळेत हजेरी लावली असता, पालकांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. मात्र शाळेतील शिक्षकांनी सावरासवर करण्याचा प्रयत्न करीत शाळेतून पळ काढला. यादरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव महाजन हजर झाले. त्यांनी पालकांची समजूत काढत प्रकरण मिटवले.  मात्र, शाळा व्यवस्थापनाने अद्याप संबंधित ज्युस कंपनीच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही.

रुग्णालयात दाखल असलेले विद्यार्थी

आनंदी वारे, प्राजक्ता गुजर, शास्वती गोसावी, ज्योती महाजन, श्रावणी जगताप, ओम चवदारी, दीक्षा पगारे, अनुष्का कांबळे, हर्षदा पाटील, रोशन देवगिरे, आपमा शेख, तसेच पूर्ण नाव माहीत नसणारे श्रुती, धनश्री आदी.