Wed, Jun 03, 2020 18:35होमपेज › Nashik › नाशिक : तीन वेगवेगळ्या अपघातात १४ ठार 

नाशिक : तीन वेगवेगळ्या अपघातात १४ ठार 

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 28 2017 11:44PM

बुकमार्क करा
सटाणा-मालेगाव रोडवर रिक्षा अपघातात सात ठार

नाशिक : प्रतिनिधी

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवासाठी माल खरेदी करून परतणार्‍या फिरस्ती व्यावसायिकांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सात जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील शेमळीजवळ घडली. मृतांमध्ये मालेगाव येथील रिक्षाचालकांसह दोन जण खानदेशवासी, तर उर्वरित झारखंड आणि उत्तर प्रदेशातील आहेत.
यात्रेत व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक माल खरेदीसाठी मुंबई येथे गेले होते. लक्झरी बसने मालेगावपर्यंत आल्यानंतर सहाही जण अ‍ॅपेरिक्षा (क्र. एमएच 41 व्ही 1559)ने सटाणा येथेे पहाटे परत येत होते. शहर पाच किमीवर असताना शेमळीजवळ अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली.

रिक्षा-ट्रक धडकेत पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार-धडगाव रस्त्यावर अमोदा-म्हसावद गावाजवळ अ‍ॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच ठार, तर 11 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयत व जखमी तलावडी आणि लक्कडकोट येथील रहिवासी असून, हेे सर्वजण इंदल (आदिवासी उत्सव) मधून येत असताना हा अपघात झाला आहे.

शहादा तालुक्यातील धडगाव रस्त्यावर अमोदा गावाजवळ गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास इंदलवरून जाणार्‍या अ‍ॅपेरिक्षाला (एमएच 39 डी 895) धान्य वाहतूक करणारा ट्रक (एमएच 18 ए 7473) याने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पाच जण जागीच मरण पावले. तर 11 जण जखमी झाले. जखमींवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयतामध्ये संजय रायमल रावताळे (32) रा. लक्कडकोट,  गोरख इदास पावरा (40), रोहिदास कमा पावरा (65), गुलाब फकिरा पावरा (60), शिकार्या पाच्या रावताडे (65) सर्व रा. तलावडी, ता. शहादा  येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नांदगावजवळ दोन शेतकर्‍यांचा अंत

पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप घेऊन घराकडे  निघालेल्या दोन युवा शेतकर्‍यांना एका भरधाव वेगाने मालेगावकडे जात असलेल्या ट्रक ने नांदगावजवळील पोखरी शिवारात उडवले. या अपघात दोन्ही युवा शेतकरी जागीच ठार झाले.  अपघातानंतर  पळून जात असलेल्या या ट्रक चालकाला जळगाव बुद्रुक येथे  एका शेतकर्‍यांनेच सिने स्टाईल पाठलाग करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

चिंचविहीर येथील अजय जाधव (वय 22), मन्साराम जाधव (वय 34) हे दोघे नांदगावहून पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप घेऊन दुचाकीने( क्रमांक एम. एच.16 बी.जी.9033)  घरी निघाले होते. पोखरी शिवारात खार्‍या ओहळ जवळ येथे त्यांची मोटार सायकल शिवूर बंगल्याहून मालेगावकडेे कांदे भरण्यासाठी येणार्‍या ट्रकला घडकली. जोरदार धडक बसल्याने मोटारसायकलवरील दोघेही जण हवेत फुटबॉल सारखे उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ही घटना घटल्यानंतर ट्रक चालकाने ट्रक पुन्हा मागे वळून पुन्हा औरंगाबादच्या दिशेने पळवला. हे पाहिल्यानंतर सोमनाथ गिते यांनी  ट्रकचा पाठलाग केला कासारी हद्दीत या ट्रकला थांबवण्यात यश मिळवले, ट्रक चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.