Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Nashik › नाशिकमध्ये १३९ रिक्षांसह बेशिस्त चालक ताब्यात

नाशिकमध्ये १३९ रिक्षांसह बेशिस्त चालक ताब्यात

Published On: Dec 19 2017 7:55PM | Last Updated: Dec 19 2017 7:55PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे रिक्षा निगराणी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी साध्या वेशात पाहणी करून १३९ बेशिस्त रिक्षाचालकांना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. पोलिसांनी रिक्षाही जप्त केल्या असून या कारवाईने बेशिस्त रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

शालिमार, द्वारका, रविवार कारंजा, जेहान सर्कल, कॉलेज रोड आदी वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाचालक बेशिस्तरित्या रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करत असतात. सर्वसामान्य नागरिक व इतर वाहन चालकांना अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. याची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी रिक्षा निगराणी पथकाची स्थापना करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेस दिले होते. त्यानुसार या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करून मंगळवारी (दि. १९) दिवसभर पाहणी केली. पथकातील साध्या वेशामधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरातील अनेक रिक्षा स्थानकांवर गस्त घातली. त्यात बेशिस्तपणे रिक्षा उभा करणे, प्रवाशांची, इतर नागरिकांशी अरेरावी करणार्‍या १३९ रिक्षाचालकांना ताब्यात घेत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बेशिस्त रिक्षाचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढे रोज रिक्षा निगराणी पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात पाहणी करून बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.