Thu, Sep 19, 2019 03:26



होमपेज › Nashik › मलकापुरात भीषण अपघात; १३ ठार, ३ गंभीर जखमी

मलकापुरात भीषण अपघात; १३ ठार, ३ गंभीर जखमी

Published On: May 20 2019 8:13PM | Last Updated: May 20 2019 8:16PM




जळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धरणगाव नजीक असलेल्या रसोया कंपनी समोर ट्रक व टाटा मॅक्समध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली. मृतांमध्ये पुरूष, महिला, मुलीसह मुलांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर धरणगांव जवळच असलेल्या रसोया कंपनी समोर मुंबई कडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रक क्रं. एमएच ४० बीजी ९११२ व मलकापूरहुन अनुराबादकडे जाणाऱ्या टाटा  मॅक्स क्रं. एमएच ४६ एक्स ७९२५ मध्ये दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा मॅक्समध्ये असलेल्या १६ जणांपैकी १३ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष अँड हरीश रावळ हे रुग्णवाहिका, क्रेन घेवून अपघातस्थळी पोहचले. उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीष बोबडे, शहर पो. नि. हनुमंत गायकवाड, ग्रा. पो. नि. जायभाये आदी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. नागरिकांच्या सहकार्याने ट्रक खाली दबलेल्या मॅक्समधील तिघा जखमींना क्रेनच्या साह्याने बाहेर काढले. 

अनिल मुकुंद ढगे (वय ४०, रा. अनुराबाद), किसन सुकदेव बोराडे (४२, रा.अनुराबाद), नथ्थु वामन चौधरी (४०,  रा. अनुराबाद), छाया गजानन खडसे (४०, रा. अनुराबाद), प्रकाश किसन भारंबे (४०, रा. जामनेर रोड, भुसावळ), मेघा प्रकाश भारंबे (३५, रा. जामनेर रोड, भुसावळ), सोमीबाई छगन शिवडतकर (२६, रा. नागझिरी, जि. बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश), सतिश छगन शिवडतकर (०३, रा.नागझिरी), विरेन गोकुळ भिलवतकर (०७, रा.नागझिरी (मध्यप्रदेश), मिनाबाई बिलोरकर, आरती, रेखा यांच्यासह सहा महिला, पाच पुरूषांसह दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रकात स्फोटक साहित्य असल्याने व ग्रामस्थांचा रोष पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी बोबडे यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलाविले. शहर, ग्रामीण पोलिस, हायवे पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, उप अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी भेट दिली. मृतकांचे शवविच्छेदन उशिरापर्यंत सुरु होते. या अपघातानंतर अनुराबाद गावावर शोककळा पसरली होती.