Sat, Jul 20, 2019 11:03होमपेज › Nashik › समृद्धी प्रकल्पासाठी 13 कंपन्या ठरल्या पात्र

समृद्धी प्रकल्पासाठी 13 कंपन्या ठरल्या पात्र

Published On: Jun 01 2018 12:23PM | Last Updated: May 31 2018 10:45PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी 13  पात्र कंत्राटदार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) या कंपन्यांची नावे; गुरूवारी (दि. 31) जाहीर करण्यात आली. प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पूर्व विभागाचे कंत्राट दिलीप बिल्डकॉनला तर पश्‍चिम विभागाचे कंत्राट बीएससीपीएलला देण्यात आले आहे. 

मुंबई-नागपूरदरम्यान, 701 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग उभाण्यात येत आहे. महामार्ग उभारणीसाठी नागपूर ते मुंबई अशा 16 टप्यात विभागणी करण्यात आली आहे. या 16 पैकी 13 विभागांमधील प्रकल्पाच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होेत्या. त्यामध्ये कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, एमएसआरडीसीने गुरूवारी निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 13 कंपन्यांची नावे अंतिम करून ती जाहिर केली. या कंपन्यांना 13 विभागात नेमण्यात आले आहे. दरम्यान, पात्र कंपन्यांमध्ये नाशिकच्या एल ऍन्ड टी कंपनीचा समावेश आहे. औरंगाबाद पश्‍चिम विभागाची जबाबदारी एल ऍण्ड टी वर सोपविण्यात आली आहे. 46 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणार आहे.

आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार उभाण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत राज्यात 81 टक्के जमीन थेट खरेदीद्वारे अधिग्रहीत करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर भविष्यात नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामार्गामुळे निम्म्यावर येणार आहे. तसेच राज्याच्या कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना चालना मिळणार असून त्याद्वारे रोजगार निर्मिती होईल.

वित्तीय निविदांची प्रक्रिया पूर्ण करतानाच या महत्त्वाच्या प्रकल्पातील आणखी एका टप्प्याची यशस्वी पूर्तता आम्ही केली आहे. नावे जाहीर झालेल्या कंपन्यांनी महामंडळाकडे सादर केलेल्या मूल्यांकनाचा आढावा घेण्याची प्रक्रिया हा आता पुढील टप्पा असेल. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित कंपन्यांना कार्यारंभ आदेश दिले जातील. 16 विभागांपैकी उर्वरित तीन विभागांसाठीही निविदांचे काम प्रगतीपथावर आहे. 

-राध्येशाम मोपलवार, उपाध्यक्ष, एमएसआरडीसी.