Thu, Apr 25, 2019 05:55होमपेज › Nashik › इगतपुरीजवळ एक्सप्रेसचे डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक कोलमडली

इगतपुरीजवळ एक्सप्रेसचे डबे घसरल्याने रेल्वे वाहतूक कोलमडली

Published On: Jun 10 2018 9:14AM | Last Updated: Jun 10 2018 9:14AMनाशिक : पुढारी ऑनलाईन

मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन डबेच रेल्वे रूळावरून घसरल्याने मध्यरेल्वेची चार तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातामुळे मनमाडहुन मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.

याबाबात सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या मेलचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळील तीन लकडी पुलाजवळ घसरल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला असून मोठी जिवीतहानी टळली. अपघाताची माहिती समजताच रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर घसरलेले डब्बे काढण्याचे काम सुरु केले.

हावडा मेलेचे उर्वरीत डबे कसारामार्ग मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वे स्थानकात आणून प्रवाशांची सुटका करुन इतर गाडीने मार्गस्थ करण्यात आल्या. या अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. अपघातामुळे मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. तर लांब पल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.