होमपेज › Nashik › नाशिक : बदलीसाठी १०७ शिक्षकांनी सादर केली खोटी माहिती

नाशिक : बदलीसाठी १०७ शिक्षकांनी सादर केली खोटी माहिती

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 11:23AMनाशिक : प्रतिनिधी

बदलीच्या पत्नी-पती एकत्रीकरण निकषात बसण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १०७ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याची धक्‍कादायक बाब कागदपत्र तपासणीत उघड झाली आहे. तर १७ शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केले आहेत. बदलीसाठी खोटी माहिती सादर करणे ही फसवणूक आहेच शिवाय पात्र अन्य शिक्षकांवर अन्यायही करणारी असल्याने संबंधितांबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे विस्थापित शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी सरकारी पातळीवरून झाल्या आहेत. त्यात पावणेपाच हजार शिक्षकांचा समावेश आहे. बदलीसाठी सार्‍याच शिक्षकांकडून ऑनलाइन माहिती भरून घेण्यात आली होती. बदली झाल्यानंतर ही माहिती पडताळून पाहण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करण्याचे हाती घेण्यात आले होते. त्यात १०७ शिक्षकांनी अंतरात हेराफेरी केल्याचे दिसून आले होते. ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असेल तर संबंधित शिक्षकांना पती-पत्नी एकत्रीकरण या निकषानुसार बदलीचा लाभ देण्यात येतो. पण, या १०७ शिक्षकांनी ३० किलोमीटरच्या असताना त्यापेक्षा अधिक अंतर दाखविल्याची बाब कागदपत्र तपासणीत उजेडात आली. १७ शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केल्याचेही निष्पन्न झाले.