होमपेज › Nashik › 100 अंगणवाड्यांना टाळे लागणार

100 अंगणवाड्यांना टाळे लागणार

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:40AMनाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या 37 शाळा विलीनीकरण करण्याच्या निर्णयानंतर आता मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मनपाच्या 100 अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून, तो महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. खोटी पटसंख्या दाखवून मनपाची फसवणूक होत असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. 

आयुक्‍तांच्या अंगणवाड्या बंद करण्याच्या या निर्णयामुळे दोनशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आयुक्‍तांकडून एक-एक निर्णय घेतला जात असल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच आयुक्‍तांनी मनपा शाळांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यास मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना सांगितले होते. त्यात शाळांची पटसंख्या, शिक्षक व मुख्याध्यापकांची संख्या तसेच जवळपास असलेल्या शाळांचे अंतर याविषयी माहिती मागविली होती.

त्यात पटसंख्या अत्यंत कमी असलेल्या तसेच शाळांचे अंतर केवळ एक ते दीड कि. मी. पेक्षाही कमी असलेल्या शाळांची संख्या 37 निघाली. यामुळे या शाळा इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय मनपा आयुक्‍तांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोच आता शहरासह परिसरातील 100 अंगणवाड्या कायमच्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या अंगणवाड्यांवर खर्च होणार्‍या अनुदानाची बचत होऊन एकप्रकारे होत असलेली फसवणूक टळणार आहे. 14 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचा यात समावेश आहे. त्यात पंचवटीतील 18, सिडकोतील दोन, नाशिकरोडमधील 19, सातपूरमधील सात इतक्या अंगणवाड्यांची संख्या आहे. पूर्व व मध्य विभागातील संख्या मिळू शकली नाही. शहरात मनपाच्या 413 इतक्या अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 76 अंगणवाड्या या खासगी जागेवर आहेत.

Tags : Nashik, 100, anganwadas, stopped