होमपेज › Nashik › पिस्तुलाचा धाक दाखवून १० लाख रुपये केले लंपास

पिस्तुलाचा धाक दाखवून १० लाख रुपये केले लंपास

Published On: Dec 24 2017 4:07PM | Last Updated: Dec 24 2017 4:07PM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान औदयोगिक वसाहतीमधील भवानी ट्रेडर्स या कंपनीत पिस्तुलातुन गोळीबार करून १० लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरटयांनी कंपनीच्या पैसे ठेवलेल्या खोलीबाहेर १५ मिनिटे गोंधळ घातला. गोळीबार आणि चोरी करणारे तिघे चोरटे सीसीटीव्हीमधे कैद झाले आहेत.

अवधान शिवारामधे कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहीत यांच्या मालकीची भवानी ट्रेडर्स ही कंपनी आहे. कामकाज झाल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बंद कार्यालय बंद केले जाते. या कंपनीची देखभाल सुजानसिंग वगताजी राजपुरोहीत करतात. यानंतर व्यवस्थापक सुजानसिंग हे कपाट ठेवलेल्या खोलीतच झोपतात. तर उर्वरीत कामगार हे या खोलीच्या मागील बाजूस असलेल्या खोलीमधे झोपतात. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या खोलीच्या लोखंडी खिडकीची कडी उचकटुन अज्ञात व्यक्तीने राजपुरोहीत यांना आवाज दिला. यावेळी चोरटयाने त्यांना गावठी पिस्तुलाचा धाक दाखवुन दरवाजा उघडण्यासाठी धमकी दिली. यावेळी राजपुरोहीत हे दरवाजाच्या मागे लपले तेव्हा चोरट्याने गोळीबार केला. त्यामुळे घाबरून राजपुरोहीत यांनी दरवाजा उघडला. यानंतर तीन चोरटयांनी खोलीत प्रवेश केला. या चोरटयांनी राजपुरोहित यांना मारहाण करून कपाट उघडुन त्यातील रोकड काढुन पलायन केले. बाहेर गेल्यानंतर त्यांनी आवारात कानासिंग भील यास देखिल मारहाण करून त्याला जखमी केले आहे. 

याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळास भेट दिली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मोहाडी पोलिसांच्या पथकाने चोरटयांचा माग काढण्यास सुरूवात केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

कंपनीच्या या खोलीमधे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.  यात चोरटे चोरी करताना तसेच राजपुरोहीत यांना पिस्तुलाचा धाक दाखवुन गोळीबार करताना दिसत आहेत. पण त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने चोरटयांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. 

दरम्यान कंपनीच्या मालकाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. पण त्याच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसत आहे. आता २०१७ वर्ष सुरू आहे. पण रेकॉर्डीगचे वर्ष  २०००दिसत आहे. तसेच या कॅमे-याची रेकॉर्डींग क्षमता अवघी तीन दिवस ईतकीच आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम कंपनीत असतानाही सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नाही. ही कंपनी औदयोगिक वसाहतीच्या एका टोकाला असल्याने या भागात मोहाडी पोलिसांची गाडी केवळ एकदाच गस्त घालण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चोरटयांनी लक्ष ठेऊन या कंपनीत चोरी केल्याचे प्रथमदर्शी दिसुन येते आहे. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवी कलम 394 तसेच भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.