Sat, Aug 24, 2019 23:14होमपेज › Nashik › ‘जायकवाडी’च्या 31 टीएमसी पाण्याची चोरी

‘जायकवाडी’च्या 31 टीएमसी पाण्याची चोरी

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:58PM

बुकमार्क करा

नाशिक ः विशेष प्रतिनिधी

सन 2012 मध्ये दुष्काळ पडला असताना जायकवाडी धरणातील 3.5 टीएमसी पाणी चोरी झाल्याची दखल न्यायालयाने घेतली होती. मात्र, ऑक्टोबर 2016 ते जुलै 2017 या नऊ महिन्यांच्या कालावधीत जायकवाडी धरणातुन चक्क 31 टीएमसी पाण्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. या प्रकरणी पोेलिसांनी आठ दिवसांत गुन्हा दाखल केला नाही, तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दिला आहे.

15 ऑक्टोबर 2016 रोजी जायकवाडी धरणात 2531.60 दलघमी पाणीसाठा होता. त्यात उपयुक्त 1793.49, मृत 738.11 दलघमी साठा होता. धरण 82.61 टक्के भरलेले होते. हाच साठा 1 जुलै 2017 रोजी एकूण 1135.10, उपयुक्त 396.99 दलघमी याप्रमाणे होता. त्यापैकी ऑक्टोबर ते जुलै या नऊ महिन्यांत 1396.50 दलघमी पाणी वापरण्यात आले. 24 नोव्हेंबर 2017 रोजी उपविभागीय अधिकारी, जायकवाडी पाटबंधारे उपविभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार 73.28957 दलघमी पाणीपुरवठा करण्यात आला. त्या मोबदल्यात 785.26 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. जायकवाडीच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन दरवाजांतून नऊ महिन्यांत सात आवर्तने सोडण्यात आली.

सिंचनासाठी 4.7575 दलघमी पाणी वापरण्यात आले. त्यातून 3,81,067 रुपये महसूल प्राप्त झाला. जायकवाडीच्या  शाखाधिकार्‍यांनी 5 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या माहितीनुसार जलसिंचनाद्वारे शेतीसाठी एकूण 29.541038 दलघमी पाणी उपसा करण्यात आला. बिगर सिंचन वापर 73.28957 दलघमी, कालव्याद्वारे पाणीवापर 4.75750 आणि उपसा जलसिंचनाद्वारे झालेला पाणीवापर 29.54103 दलघमी झाला. या सर्वांचा एकत्रित पाणीवापर पाहिल्यास 107.58810 दलघमी पाणी वापरण्यात आले. परंतु, ऑक्टोबर 2016 ते जुलै 2017 या कालावधीत केवळ 1396.50 दलघमी पाण्याचा हिशेब असल्याचे दिसते.

त्या 1396.50 दलघमी पाण्यातून 107.58810 पाणी कमी केल्यास 1288.9119 दलघमी पाण्याचा हिशेब उपलब्ध नाही. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन लक्षात घेता एकूण पाणीसाठ्याच्या 20 टक्के म्हणजे नऊ महिन्यांत 400 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन गृहीत धरले तरी 888.9119 दलघमी पाण्याचा हिशेबच लागत नाही. जर 73.28957 दलघमी पाण्यापासून 7 कोटी 85 लाख 26 हजार रुपयांचा महसूल मिळू शकतो, तर 888.8119 दलघमी पाण्यापासून 95 कोटी 24 लाख 233 रुपयांचा महसूल मिळाला असता. मात्र, पाणीचोरीमुळे शासन या महसुलाला मुकले आहे. पाणीही चोरीला गेले अन् महसूलही बुडाल्याने पाटबंधारे विभागाची अवस्था ‘तेलही गेले अन् तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’, अशी झाली आहे.