Sun, Feb 17, 2019 16:04होमपेज › Nashik › ‘नाणार’ प्रकल्प रेटल्यास राजीनामा देऊ : ना. देसाई

‘नाणार’ प्रकल्प रेटल्यास राजीनामा देऊ : ना. देसाई

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:20AMनाशिक : प्रतिनिधी  

कोकणामध्ये होणार्‍या नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. परंतु, सेनेच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून केंद्र शासनाने नाणार प्रकल्प लवकरच सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. जर हा प्रकल्प झाला तर राज्याच्या उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा सुभाष देसाई यांनी केली. नाशिकमध्ये आगामी औद्योगिक धोरणांविषयीच्या चर्चासत्रानंतर पत्रकार परिषदेत त्यांना ‘नाणार’ विषयी प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर नाणार ना ना असे उत्तर देत स्मितहास्य करत या प्रकल्पाला विरोध केला. 

गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये नाणार प्रकल्प होणारच, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. तर हा प्रकल्प कोकणासाठी हानिकारक असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला. 

त्यामुळे जर हा प्रकल्प झाला तर राज्याच्या उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा सुभाष देसाई यांनी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणी शिवसेनेची चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. उद्योगमंत्री देसाई यांना नाणार प्रकल्पाबाबत प्रश्‍न विचारला असता ना ना म्हणत स्मितहास्य केले. महाराष्ट्र औद्योगिकविकास महामंडळाने गेल्या तीन वर्षांत राज्यातील तीन हजार भूखंड ताब्यात घेतले असून, लवकरच त्याची फेरवाटप प्रक्रिया करणार आहे.  अनेक उद्योजकांनी बळकावलेले भूखंड व रिकामे भूखंड ताब्यात घेतले जात आहे. प्लॉट ताब्यात घेताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत.परंतु, कोणत्याही परिस्थितीत हे प्लॉट नवीन उद्योजकांना देणार आहे. नाशिकमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी आगामी औद्योगिक धोरणांत उपाययोजना राहणार असल्याचे आश्‍वासनदेखील उद्योगमंत्री देसाई यांनी दिले.