Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Nashik › फसवणुकीतील संशयितांच्या वाहनावर ‘आमदार’ चिन्ह

फसवणुकीतील संशयितांच्या वाहनावर ‘आमदार’ चिन्ह

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:03PMनाशिक :  प्रतिनिधी

एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून देण्याच्या मोबदल्यात 18 लाखांचा गंडा घालणार्‍या दोघा भामट्यांना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून फसवणुकीतील 18 लाख 60 हजारांसह रोख रक्कम 70 हजार व टाटा सफारी कार असा सुमारे 25 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या भामट्यांकडून 10 कोटी व 1 कोटी 25 लाख रुपयांचे दोन धनादेशही जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाहनावर ‘विधानसभा सदस्य’ आणि ‘आमदार’ असे चिन्ह असल्याने या संशयितांना कोणत्या आमदाराचे अभय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी धनंजय एकनाथ महाजन (रा. लोहणेर, ता. देवळा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार महाजन यांना संशयित राकेश पानपाटील (33, जगतापनगर, सिडको) व आकाश सोनवणे (23, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी शेतात पॉलीहाउस आणि गायींच्या गोठा उभारणी व इतर कारणांसाठी पाच कोटी 23 हजारांचे कर्ज काढून देतो, असे सांगून प्रोसेसिंग फी म्हणून 18 लाख 60 हजार रुपये घेतले. तसेच त्यांना कर्जाच्या रकमेचा बनावट धनादेशदेखील दिला होता. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाजन यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोेध घेऊन सातपूर एमआयडीसीत सापळा रचून अटक केली. यावेळी संशयितांकडून गुन्ह्यातील 18 लाख 60 हजार रुपये तसेच रोख रक्कम 70 हजार रुपये, टाटा सफारी एमएच15, ईबी, 0144 कार, अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल, तसेच 10 कोटी 25 लाख आणि 1 कोटी 25 लाखांचे दोन धनादेश आढळून आले. 

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.