Mon, Apr 22, 2019 11:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नकार देणार्‍या प्रेयसीला घरात कोंडून तरुणाची आत्महत्या

प्रेयसीला घरात कोंडून तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 8:43AMघाटकोपर : वार्ताहर

प्रेयसीने नकार दिल्याने तिला घरात कोंडून सौरव उर्फ साहिल सुनील हांडे (20) या प्रियकराने दुसर्‍या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घाटकोपरच्या भटवाडी विभागात घडली. तो वाणिज्य शाखेत दुसर्‍या वर्षात शिकत होता. सौरवच्या कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.              

गेली काही वर्षे त्याचे याच विभागात राहणार्‍या 17 वर्षीय तरुणीशी सूत जुळले. याबाबतची माहिती  दोघांच्याही घरच्यांना होती. काही दिवसांपासून  तरुणीने सौरवला नकार देण्यास सुरवात केल्याने तो वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होती. सोमवारी सायंकाळी सौरवने तिला गाठले. हातातील मोबाईल काढून तिला घरी येण्यास सांगितले. तरुणी मोबाईलसाठी त्याच्या घरी गेली.  

पोटमाळा असलेल्या त्याच्या घराच्या खालच्या भागात दोन रूम असून  यातील आतील रूममध्ये  तरुणीला नेऊन तो समजावण्याचा प्रयत्न करू लागला. तरीदेखील तिने त्याला नकारच दिला. अखेर रागाच्या भरात तरुणीला आतल्या खोलीत  ठेवून त्याने खोलीची कडी लावून घेतली. 

बाहेरच्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने घरी परतलेल्या  तरुणाच्या भावाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. त्याने शेजार्‍यांच्या मदतीने दरवाजा तोडून सौरवला रुग्णालयात नेले.  परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तर सौरभचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.