Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईल खेचल्यानेे लोकलमधून पडून कळव्यात तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)

मोबाईल खेचल्यानेे लोकलमधून पडून कळव्यात तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 2:09AMठाणे : प्रतिनिधी 

नाशिकहून मित्राच्या वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी दिव्यात नातेवाइकाकडे आलेला 35 वर्षीय तरुण चेतन अहिरराव याच्या हातातील मोबाईल पळवण्याचा प्रयत्न चोरट्याने केला आणि चोराला पकडण्यासाठी चेतनने लोकलमधून मारलेली उडी त्याचा जीव घेणारी ठरली.

मोबाईल चोरट्याचा हा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने चेतनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आरोपी अजय सोलंकी (19, रा. कळवा) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करीत ठाणे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

चेतन अहिरराव (35, रा, नाशिक) हा 19 ऑगस्ट रोजी दिव्यातील नातेवाइकाच्या घरी आला होता. मित्राचा वाढदिवस साजरा करून पुन्हा तो दिव्याला निघाला होता. मध्यरात्री 12.50 च्या सुमारास लोकल कळवा स्थानकात आली. लोकल पुन्हा सुरू झाली. लोकलच्या दरवाजात चेतन उभा होता. त्याच्या हातात महागडा मोबाईल होता. कळवा स्थानकावरील मोबाईल चोरटा आरोपी अजय सोलंकी याने चेतनच्या हातातील मोबाईल खेचला आणि चोराचा पाठलाग करण्यासाठी चेतनने लोकलच्या गतीचा विचार न करता उडी मारली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. हे थरारनाट्य स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाले. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागताच आरोपी अजय सोलंकीला अटक करणे शक्य झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले.