Thu, Jun 27, 2019 00:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिखलोली धरणात युवकाचा बुडून मृत्यू

चिखलोली धरणात युवकाचा बुडून मृत्यू

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:17AMअंबरनाथ : प्रतिनिधी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या चिखलोली धरणात बुधवारी सायंकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेल्या एका युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.  पृथ्वी तिरुओन (20) असे या युवकाचे नाव आहे. पृथ्वी हा अंबरनाथ पूर्व भागातील शिवधाम कॉम्पेक्स येथे राहणार होता. कॉलेज करून तो नोकरीही करीत होता. या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

पृथ्वी आपल्या मित्रांसोबत नेहमीच विविध ठिकाणी पोहण्यासाठी जात असे. बुधवारी तो प्रथमच अंबरनाथ येथील चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. रात्रभर स्थानिक नागरिक आणि अग्‍निशमन दलाचे जवान पृथ्वीचा शोध घेत होते. मात्र त्याचा मृतदेह सकाळी सापडला. या घटनेची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

धरणात पोहण्यास बंदी घालावी

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यभागी अंबरनाथ नगपरिषदेचे सहा एमएलडी क्षमतेचे ब्रिटिशकालीन धरण आहे. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात युवक व प्रेमी युगुल फिरण्यासाठी येत असतात. याशिवाय पोहण्यासाठीही मोठ्या संख्येने तरुण मंडळी व नागरिक येत असतात. यापूर्वीही धरणात पोहताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे धरणातील पोहण्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना विचारले असता, ‘यासंदर्भात तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्र पाठवून या ठिकाणी सुरक्षिततेचे फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणाहून पोहण्यासाठी जाता येते ती ठिकाणे बंदिस्त करावीत, असेही आदेश देण्यात आल्याचे त्यांना सांगितले.