Fri, May 24, 2019 09:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिर, हात वेगळे करून मृतदेह गाडला!

शिर, हात वेगळे करून मृतदेह गाडला!

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 12:57AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याणच्या शंकर गायकवाड यांची अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचे शीर आणि दोन्ही हात धडावेगळे करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शंकर यांचा अर्धवटावस्थेत गाडलेला मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांचे दोन्ही हात आणि शीर शोधण्याच्या तपासालाही वेग दिला आहे. 

तिसगाव येथील श्री सद‍्गुरू कृपा इमारतीत राहणारे शंकर गायकवाड हे 18 मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि तेव्हापासून बेपत्ता झाले होते. पत्नी आशा हिने तीन दिवसानंतर आपला पती बेपत्ता झाल्याचा कांगावा करून तशी तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली. वास्तविक ज्या रात्री शंकर बेपत्ता झाले त्याच रात्री त्यांना गुंगीचे औषध पाजून रिक्षातून अपहरण करण्यात आले. प्रवासादरम्यान आशा ही एका धाब्याजवळ उतरली. तर जगन कोरी आणि राहुल म्हात्रे याने बेशुद्धावस्थेत असलेल्या शंकर यांना धरून बसले. 

प्रीतम हा रिक्षा चालवत होता. बदलापूर-वांगणीदरम्यान रेल्वे पटरीलगत शंकर यांना रिक्षातून उतरवले. तोपर्यंत हिमांशू दुबे हा त्याच्या यामाहा दुचाकीवरून तेथे पोहोचला होता. प्रीतम याने शंकर यांच्या डोक्यात स्टंपचे फटके मारले. तर जगन कोरी याने गळा आणि दोन्ही हात कापून धडावेगळे केले. त्यानंतर सर्वांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या खड्ड्यात अर्धवटावस्थेत गाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवयित्री गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने 1 जूनला संशयित आरोपी हिमांशू दुबे व शंकर यांची पत्नी आशा हिला ताब्यात घेतले. 

या दोघांनी दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शंकर यांचा पूर्णतः सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रूग्णालयात पाठविला. मुंडके आणि दोन्ही हात नसलेल्या मृतदेहाच्या कमरेला असलेल्या करगोट्यात तांब्याचा पैसा आणि पायाची करंगळी दुमडलेली असल्याने हा मृतदेह शंकर यांचाच असल्याची खात्री पटली. नातेवाईकांनी ताब्यात घेतलेल्या मृतदेहावर त्याच रात्री तिसगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

30 लाखांची सुपारी : शंकरचा काटा काढण्यासाठी आशा हिने कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात असलेल्या गोपाळनगर-आधार सोसायटीत राहणारा हिमांशू अशोक दुबे (22) याला 30 लाखांची सुपारी दिली. त्यानुसार हिमांशू याने राज सिंग, जगन कोरी, राहूल म्हात्रे आणि प्रीतम यांची जमवाजमव केली. शंकरला उडविण्याचा कट शिजल्यानंतर आशाने प्रत्येकाला 1 लाखांचा बयाना दिला. हत्यारे आणि वाहनांची व्यवस्था केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आशा आणि सुपारी बहाद्दर हिमांशू या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे शंकर यांचे मुंडके आणि दोन्ही हात छाटण्यासाठी अवजड हत्यार वापरल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच ही हत्यारे आणि छाटलेले मुंडके व हात या अवयवांची विल्हेवाट कुठे लावण्यात आली, याचाही शोध सुरू आहे.