Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये तरुणाची अल्पवयीनाकडून भोसकून हत्या

भांडुपमध्ये तरुणाची अल्पवयीनाकडून भोसकून हत्या

Published On: Mar 25 2018 2:20AM | Last Updated: Mar 25 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

भांडूपमध्ये प्राणघातक हल्ल्यांचे सत्रच सुरू असून नुकत्याच घडलेल्या तिहेरी हत्याकांडानंतर चाकूने भोसकून एका अल्पवयीनाने 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. तर दुसर्‍या घटनेत चार जणांच्या सशस्त्र टोळीने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला आहे.

भांडुप पश्‍चिमेकडील तानाजीवाडी परिसरात राहात असलेला रामजी राजभर (27) हा तरुण शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील पाईप लाईनजवळ असलेल्या एका पानटपरीवर उभा होता. तेथे पोहचलेल्या 17 वर्षीय मुलाने सिगारेट ओढून त्याचा धूर राजभर याच्या तोंडावर सोडण्यास सुरूवात केली. त्यावरुन झालेल्या वादातून या अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने राजभरवर वार केले. राजभर रस्त्यावर कोसळताच या अल्पवयीन हल्लेखोर मुलाने तेथून पळ काढला. भांडूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील राजभरला उपाचरांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. .

दुसर्‍या घटनेमध्ये, येथील टेंभीपाडा रोडवर असलेल्या शिवाजी नगरामध्ये राहात असलेला अनिकेत अमराळे (24) हा तरुण गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा मित्र विघ्नेश महाडीक (20) याच्यासोबत खडीमशीन येथील एका चहाच्या टपरीवर उभा होता. तेथे पोहचलेल्या चार सशस्त्र तरुणांच्या टोळीने लोखंडी रॉडने दोघांनाही बेदम मारहाण करुन पळ काढला. पुर्व वैमनस्यातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

Tags : mumbai news, crime, young man murder,  Bhandup