Tue, Sep 25, 2018 11:15



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुण आमदारांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आघाडीसाठी दबाव

तरुण आमदारांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आघाडीसाठी दबाव

Published On: Dec 20 2017 3:44PM | Last Updated: Dec 20 2017 3:44PM

बुकमार्क करा





नागपूर : विशेष प्रतिनिधी

विधानसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांनी आपआपल्या नेत्यांवर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अन्यथा पुन्हा विरोधात बसायला लागेल, असा इशाराही त्यांनी नेत्यांना दिला आहे.

राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. नापिकी, अवेळी पावसाने पिकांना बसणारा फटका व कर्जमुक्तीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. सध्या ग्रामीण भागात भाजप सरकारच्या विरोधात नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला याचा राजकीय लाभ उचलता येईल, असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांना वाटत आहे.

मागील निवडणुकीपेक्षा गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली असून, आमदारांचा आकडा ८० झाला आहे. तेथील पाटीदार, मुस्लिम आणि दलित मतदार काँग्रेसकडे वळला असल्याने महाराष्ट्रातही हे चित्र उभे राहू शकते. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जेष्ठ आमदारांनी मुस्लिम, दलित या परंपरागत मतदारांचा विश्वासघात केला आहे. सध्या हे दोन्ही घटक भाजपकडे वळले आहेत. त्यांना पुन्हा काँग्रेस आघाडीकडे आम्ही वळवू शकतो, असा दावा या तरुण आमदारांनी केला आहे.

काँग्रेसने आपल्या पक्षाची धुरा आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर दिली आहे. नेतृत्व बदलामुळे युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व जेष्ठांकडे असले तरी, या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा काढल्याने नेतृत्वाची दिशा बदलल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेतृत्वबदलामुळे दोन्ही पक्षातील तरुण आमदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

पंधरा वर्षे एकत्र सत्तेत असतानाही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोटावर मोजण्याइतक्या जागांवरून आघाडीमधील दोन्ही पक्षांनी काडीमोड घेतला होता. त्यामुळे भाजपला अपेक्षेपेक्षा जादा जागा मिळाल्याने या पक्षाने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभारलेल्या सहकारी संस्थांना बसत आहे. नवीन कायदे करून या संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचे तरुण आमदारांचे म्हणणे आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. या पक्षाच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे यापुढे आता शिवसेनेसोबत युती होणार नाही. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी आघाडी करा, असा दबाव तरुण   आमदारांनी टाकण्यास सुरुवात केली आहे.