Tue, Jul 23, 2019 07:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे

होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर : खडसे

Published On: Dec 20 2017 6:13PM | Last Updated: Dec 20 2017 6:19PM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

होय, मला काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातून ऑफर आहे, कार्यकर्त्यांकडूनही दबाव वाढतो आहे, मात्र मी भाजपा सोडून कुठेही जाणार नाही, असे खळबळजनक विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज केले आहे. मात्र आपल्या चौकशीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मी प्रस्थापित आहेच, त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्‍न येतो कुठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाणार की नाही, याचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र खडसेंचे पुनर्वसन करण्याची गरज नाही, तर तर पक्षाचे प्रस्थापित नेते आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशापुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

पुण्यातल्या एका भूखंडखरेदी प्रकरणी एमआयडीसीवर दबाव आणल्याच्या आरोपामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यानी गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच अडचणीत आणण्यास सुरूवात केली आहे. 

नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडक्वार्टर! त्यामुळे इथे अधिवेशन असले, की भाजपाच्या आमदारांना रेशीमबागेत बोलावून बौध्दिक दिले जाते. नव्यांना संघाची ओळख आणि जुन्यांना उजाळा, असा या बौध्दिकामागचा उद्देश असतो. आज असेच बौध्दिक रेशीमबागेत होते. त्यास एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख या दोन आमदारांनी दांडी मारली. त्याखेरीज अन्य काही आमदारदेखील अनुपस्थित होते. पण, चर्चा झाली ती खडसे आणि देशमुख यांच्या अनुपस्थितीचीच! कारण हे दोन्ही नेते सध्या नाराज आहेत. 

एकनाथ खडसे यांनाच याबद्दल विचारले, तर त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे आपण रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासवर्गाला जाऊ शकलो नाही, असे सांगितले. पाय दुखावल्यामुळे रात्रभर रूग्णालयात होतो, आणि तसा निरोपदेखील आपण नेत्यांना पाठवला आहे असे ते म्हणाले.

गेले काही दिवस तुम्ही सरकारला कोंडीत पकडता आहात. प्रश्‍नोत्तरांच्या तासात किवा लक्षवेधीवरच्या चर्चेत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर टिकेचे प्रहार करीत आहात, आणि त्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही आमदारांची साथ मिळताना दिसते, याचा अर्थ काय? असे विचारले असता, जनतेचे प्रश्‍न लवकरात लवकर सुटावेत हीच भावना त्यामागे असते, आणि याच भावनेने अन्य पक्षांचीही साथ मिळते बाकी कोणताही अर्थ काढू नका, असे खडसेंनी सांगितले. 

खडसे यांची उत्तरे त्यांच्याच शब्दात : 

सभागृहात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तुम्हाला पक्षात येण्याची ऑफर दिली, अशा ऑफर अन्य पक्षातूनही येत आहेत काय? तुमचे उत्तर काय असते त्यांना? 

खडसे : हे पहा, मी गेली चाळीस वर्षे जनसंघ आणि नंतरच्या भाजपासाठी काम करत आहे. हा पक्ष राज्यभरात नेण्यासाठी मी देखील खस्ता खाल्ल्या आहेत. अलिकडच्या काही घटनांमुळे मी मंत्रिपदावरून बाजूला झालो असलो, तरी त्यामुळे मी नाराज होऊन पक्ष सोडेन असे नाही. एक मात्र खरे आहे, की चार दशके राजकारणात असल्याने मी सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. नाथाभाऊ आपल्यासोबत असावे, यासाठी मित्रत्वाच्या नात्याने कधी गंमतीने, तर कधी गंभीरपणे विचारणा होते. पण, मी सत्तेसाठी नव्हे, तर पक्ष वाढला पाहिजे, जनतेचे प्रश्‍न सुटले पाहिजेत, यासाठी झटत आलो. केवळ सत्ता हवी असते, तेच इकडून-तिकडे तिकडून इकडे जातात. माझे कार्यकर्तेही सांगतात, किती दिवस अपमान सहन करायचा, किती छळ सोसायचा.

चूक असेल तर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी दूध का दूध आणि पानी का पानी करा, असे माझेही मत आहे. सत्य असेल तर बाहेर यावे, मी कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही. मात्र, कुणीही किरकोळ व्यक्तीने आरोप करायचे आणि त्यावरून चौकशी मागे लावून द्यायचे हे बरोबर नाही. आणि मंत्री असलेल्या अनेकांची सध्या चौकशी सुरू आहेच की, त्यांना कुठे मंत्रिपद सोडावे लागलेय? त्यामुळे मंत्री असतानाही चौकशी सुरू ठेवता येते.