Sun, Jul 05, 2020 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष!

2018 ठरणार धमाकेदार; जंबो वीकएंडचे वर्ष!

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 2:01AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नव्या वर्षाची सुरुवात व्हायचा अवकाश, लोक कॅलेंडर काढून सुट्यांचा हिशोब लावायला बसतात. जोडून कुठल्या सुट्या आल्या आहेत, तेव्हा कुठे जाता येईल, गावाकडच्या जत्रा-गणपती-होळी असे सण साधता येतील का, याचा अंदाज घेतला जातोच. 2017 या वर्षाने 14 मोठे वीकेएंड दिले. 2018 हे वर्ष मात्र तब्बल 18 मोठे वीकेंड घेऊन आले आहे. 

नव्या वर्षाच्या पहिल्याच अर्थात जानेवारी महिन्यात, तिसर्‍या आठवड्यात जोडून सुट्या आल्या आहेत. 20 रोजी शनिवार, 21 रविवार आणि 22 जानेवारीला वसंत पंचमीची सुट्टी आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यात मोठा वीकेंड जोडून आला आहे. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आला असून, शनिवार आणि रविवार त्यामागोमाग आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या बॉसला थोडासा मस्का मारू शकलात तर तुम्हाला शनिवार ते मंगळवार असा मोठा वीकेंड मिळू शकतो. 10 फेब्रुवारीला शनिवार, 11 रविवार, 12 तारखेला सोमवारी काढलेली सुट्टी आणि 13 तारखेला महाशिवरात्री असा जबरदस्त योग तुम्ही साधू शकता. 

मार्च महिन्यातही बंपर वीकेएंड आले आहेत. 1 मार्च गुरुवारी होळी आली असून, 2 मार्चला शुक्रवारी धुळवड आली आहे. 3 आणि 4 हक्‍काचे शनिवार आणि रविवार आहेत. शेवटच्या आठवड्यातही गुरुवारी 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्च गुड फ्रायडे आला आहे. शनिवार आणि रविवार लागोपाठ आहेतच. एप्रिल महिन्याचा सरता आठवडाही पर्वणीच घेवून आला आहे. 28 आणि 29 एप्रिलला शनिवार आणि रविवार आला असून, 30 एप्रिलला सोमवारी बुद्ध पौर्णिमा आहे आणि 1 मे रोजी कामगार दिनाची सुट्टी आहे. जून महिन्यात मात्र अशी एकच संधी आहे. 15 जूनला शुक्रवारी ईद उल फित्रची सुट्टी शनिवार, रविवारला जोडून आली आहे. 

ऑगस्ट महिना सर्वांचाच आवडता. कुंद वातावरणाचा जुलै सरलेला असतो, आणि वातावरण प्रसन्‍न होवू लागलेले असते. या महिन्यात स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट बुधवारी आला आहे, 17 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी  पारसी नववर्ष आहे, 18 आणि 19 ऑगस्ट शनिवार अन रविवार आहेत. 22 ऑगस्टला बुधवारी ईद -उल अदा असून, 24 रोजी शुक्रवारी ओणमची सुट्टी आहे. 25 आणि 26  शनिवार आणि रविवार आले आहेत. तुम्ही 16 ऑगस्ट (गुरुवार), 20 ऑगस्ट (सोमवार), 21 ऑगस्ट (मंगळवार) आणि 23 ऑगस्ट (गुरुवार) असे चार दिवस सुट्टी काढण्यात यशस्वी ठरला तर तब्बल 12 दिवसांची लांबवरची सहल तुम्हाला काढता येईल. 

सप्टेंबर महिन्याची सुरुवातही धमाकेदार आहे. 1 सप्टेंबरला शनिवार, 2 रविवार आणि 3 तारखेला सोमवारी जन्माष्टमीची सुट्टी आहे. गणेश चतुर्थी 13 सप्टेंबरला आली असून त्यादिवशी गुरुवार आहे, मध्ये एक शुक्रवार आला असून, 15 आणि 16 सप्टेेंबरला शनिवार, रविवार आहेत. 29 सप्टेेंबरला शनिवार, 30 सप्टेेंबर रविवार आणि 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) मंगळवारी आली आहे. ऑक्टोबर महिना म्हणजे सणांचा महिना. विजयादशमी 19 ऑक्टोबरला आली आहे. यादिवशी शुक्रवार असून, जोडून शनिवार (20) आणि रविवार (21 ऑक्टोबर) आहेत.