Fri, Apr 26, 2019 01:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील सर्वात लांब रोप वे मुंबईत होणार

जगातील सर्वात लांब रोप वे मुंबईत होणार

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी 

जगातील सर्वात लांब रोप वेे मुंबईत तयार होणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एलिफंटा ते शिवडी दरम्यान हा रोप वे तयार केला जाणार आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावर सध्या सुरू असलेल्या बोट व्यवसायाला घरघर लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी शिवडी ते एलिफंटा दरम्यान रोप वे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रोप वे च्या उभारणीची निविदा प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होईल व प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या रोप वेच्या उभारणीसाठी 600 कोटी रूपयांचा खर्च येणार असून 2020 पर्यंत हा रोप वे तयार होईल. बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर हा रोप वे तयार केला जाणार आहे. 8 किमी 300 मीटर लांबीचा हा रोप वे जमीनीपासून 150 मीटर उंचीवर असेल. शिवडी ते एलिफंटा या भागाला जोडणारा हा प्रस्तावित रोप वे जगातील सर्वात लांब ठरेल. 

या रोप वेच्या उभारणीसाठी जिओलॉजिकल सर्व्हेला 20 मार्च पासून प्रारंभ केला जाईल. समुद्रावरून तयार करण्यात येणार्‍या या रोप वेला अद्याप वन विभागाची मंजरी मिळालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्यापर्यंत ही परवानगी मिळू शकेल. सध्या क्रिसीलमार्फत निविदा प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू असून मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभारणीच्या कामाचे कंत्राट दिले जाईल. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया म्हणाले, रोप वे निर्माण करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये पोर्ट ट्रस्टला क्रिसिलची सहाय्यता मिळत आहे. वन विभागाच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला असून जून महिन्यापर्यंत परवानगी मिळेल, असा विश्‍वास आहे.