Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला शौचालयात दिला पुरुषांना प्रवेश

महिला शौचालयात दिला पुरुषांना प्रवेश

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:41AMमुंबई : प्रतिनिधी 

पश्‍चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकात असलेल्या महिलांच्या राखीव शौचालयात पुरुष प्रवाशांना जाण्याची परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर शुक्रवारी शौचालय कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली असली तरी एवढी कारवाई पुरेशी नाही, असे मत तक्रारदार शकिल अहमद यांनी व्यक्त केले आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाचा उद्घाटन समारंभ 26 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी पार पडला. मात्र, दुपारी या शौचालयात दोन पुरुष प्रवासी जात असल्याचे शकील अहमद यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस शौचालयाच्या ठिकाणी पोहोचले, त्या वेळी एक प्रवासी बाहेर पडत असल्याचे पोलिसांना दिसले. तर एक प्रवासी पोलीस येण्याआधीच तेथून निसटला होता. अधिक चौकशी केली असता, पुरुष शौचालयाबाहेर गर्दी असल्याने शौचालय कर्मचारी गुलशन कुमार यानेच संबंधित पुरुषांना महिला शौचालयाचा वापर करण्यास सांगितल्याचे समोर आले. 

शेख यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना चित्रीत केली होती. तो व्हिडीओ दाखवत त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रारही नोंदवली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे शेख याचे म्हणणे आहे. 

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांतर्फे शेख यांना एक पत्र पाठवण्यात आले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी रोशनकुमार गुप्ता (28) आणि नूर इस्लाम शेख (32) या दोघांना अटक केल्याचे त्या पत्रात म्हटले होते. पण, शेख यांनी कॉन्ट्रॅक्टरविरुद्धही कारवाई करण्याची मागणी केली आहे.