Sun, May 26, 2019 10:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील महिला आता उद्योगक्षेत्रातही घेणार भरारी

राज्यातील महिला आता उद्योगक्षेत्रातही घेणार भरारी

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:41AMमुंबई : चंदन शिरवाळे

मुंबईसह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील सुमारे पाच हजार महिलांना सरकार उद्योजिका बनविणार आहे.  भागभांडवल उभा करून उद्योग उभारल्यानंतर महिलांच्या प्रकल्पांना 15 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर उद्योग नसलेले जिल्हे आणि नक्षलग्रस्त भागात उद्योग सुरू करणार्‍या महिलांच्या उद्योगांना 35 कोटींपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. 

राज्यातील उद्योगांमध्ये उद्योगपतींच्या तुलनेने महिला उद्योजिकांचे प्रमाण केवळ 9 टक्के आहे. मात्र, क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या तुलनेने महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या मेघालयमध्ये महिला उद्योजिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्याच्या उद्योग विभागाने महिलांना उद्योगक्षेत्रात आणण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या उद्योगक्षेत्रातील महिलांचे 9 टक्के प्रमाण थेट 20 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. त्यासाठी जमीन व यंत्रसामुग्री खरेदी आणि प्रकल्पासाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महिलांच्या प्रकल्पांना कर्ज मिळवून देण्यासाठी अ‍ॅक्सिस व इतर सरकारी बँकांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी दिली. 

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील उद्योगांना विजेच्या प्रत्येक युनिटमागे 2 रुपये व इतर जिल्ह्यातील उद्योगाना 1 रुपये सवलत दिली जाईल. उत्पादन सुरू झाल्यापासुन पाच वर्षांपर्यंत ही सवलत लागू असेल. नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम प्रकल्पांना व्याजदरात सवलत दिली जाईल.  मुद्राचिन्ह विकसित करण्यासाठी केलेल्या खर्चाच्या रकमेच्या 50 टक्के व कमाल 1 कोटी रुपयांपर्यंत शासनाकडून सहाय्य दिले जाणार असल्याचेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. 

महिलांसाठी 50 कोटी रुपयांचा विशेष साहस निधी उभारण्यात येणार आहे. मॉल, रेल्वे व बस स्थानके, विमानतळ, चित्रपटगृहे, पादचारी  पूल, भुयारी मार्ग, उड्डाणपुल व व्यापार केंद्रांमध्ये महिला उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी जागा आरक्षित ठेवण्याच्या सुचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.