Tue, Mar 19, 2019 03:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलांची ऑनलाईन छेडछाड रोखण्यासाठी समिती

महिलांची ऑनलाईन छेडछाड रोखण्यासाठी समिती

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

सोशल मिडीयाचा वापर करून महिलांना अश्‍लिल संदेश पाठविणार्‍या तसेच महिलांबद्दल अवमानकारक टिपणी करणार्‍या प्रकारांची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यासंदर्भात आयोगाने एक सायबर  समिती  स्थापन केल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महिलांना त्रास देण्याचे तसेच त्यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी करण्याच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या प्रकाराला आळा घालण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आहे. नोकरदार महिला तसेच महिला लोकप्रतिनिधींकडूनही यासंदर्भात आयोगाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे ही  समिती स्थापन करण्यात आली असुन त्याची पहिली बैठक उद्या दि. 8 मे रोजी होणार आहे.

माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयाचे  सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर समितीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या  सचिव विनीता वेद, पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील  अ‍ॅड. प्रशांत माळी व वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन  या क्षेत्रात काम करणार्‍या सोनाली पाटणकर, मुक्ता चैतन्या यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. 

जाहीर अवमानकारक टिप्पणीचा महिलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होण्याची भिती असते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असुन ही समिती अभ्यास करून आपला अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करणार असल्याचे  विजया रहाटकर यांनी सांगितले.