Tue, Jul 16, 2019 00:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ट्विटरवर धाव घेणार्‍या महिलेच्या नवर्‍याला दोनदा अटक होऊनही छळ सुरूच

ट्विटरवर धाव घेणार्‍या महिलेच्या नवर्‍याला दोनदा अटक होऊनही छळ सुरूच

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

नवर्‍याच्या जाचाला कंटाळलेल्या खार येथील एका महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर टाकून पोलिसांकडे मदत मागण्यात आल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अमिता कौरचा हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी ट्विटरवर टाकला होता. मात्र संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर यापूर्वीही तिच्या नवर्‍याला दोन वेळा अटक केल्याचे पोलिसांनी आता स्पष्ट केले आहे. याचा अर्थ अटकेनंतरही हा नवरा नरमला नाहीच आणि अमिताचा छळवाद सुरूच राहिला. 

अमिताचाब विवाह गुरुप्रीत शी 1995 मध्ये झाला होता. मात्र, 2007 मध्ये गुरुप्रीतने जबरदस्तीने तिचे दागिने काढून घेतल्याचे तिने सांगितले. संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. पण, तेथे 2011 मध्ये गुरुप्रीतवरील आरोपपत्र फेटाळले गेले. मात्र, मुलांच्या भवितव्याचा विचार करून आपण पुढे जुळवून घेतल्याचा दावा अमिताने केला. शिवाय 2017 मध्ये गुरुप्रीतने गोड बोलून तिच्या मालकीच्या फ्लॅटचे कागदपत्र ताब्यात घेतले. त्यानंतर परत तिच्या छळाला सुरुवात झाल्याचे तिचे म्हणणे आहे. 

सदर जोडप्याला तीन मुले असून ते एकाच इमारतीत राहतात.  गुरुप्रीत हा  आपल्या दोन मुलांसह 11 व्या मजल्यावर राहतो. तर, अमिता या आपल्या मुलीसोबत 12 व्या मजल्यावर राहतात. अमिता यांनी यापूर्वी आपल्या पतीविरोधात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. 

पहिली घटना घडली तेव्हा त्याच्यावर घरफोडीचा आरोप ठेवण्यात आला आहे. तर दुसर्‍या प्रसंगात त्याच्यावर छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोन्ही वेळा त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर कारवाई करण्यात आमच्याकडून कोणतीही हयगय करण्यात आलेली नाही. त्याच्यावर दोन्ही गुन्ह्यात गुन्हेगारी कलमानुसार कारवाई सुरू आहे, असे झोन 9 चे पोलीस उपायुक्‍त परमजीत सिंग डाहिया यांनी सांगितले.