Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साडेतीन वर्षे बेपत्ता असलेल्या  महिलेचा गुन्हे शाखेने घेतला शोध

साडेतीन वर्षे बेपत्ता असलेल्या  महिलेचा गुन्हे शाखेने घेतला शोध

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:39AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातून तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. या विवाहितेला रत्नागिरीच्या दापोली परिसरातून सुखरुप ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका व्यक्तिला ताब्यात घेतले आहे.

अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 4 जून 2014 रोजी पोहचलेल्या एका तरुणाने त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. बेपत्ता विवाहितेचा शोध सुरु असताना पुन्हा पोलीस ठाण्यात पोहचलेल्या या तरुणाने दोन जणांनी आपल्या पत्नीचे अपरहण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करत एमआयडीसी पोलीस या विवाहितेचा शोध घेत होते.

तब्बल दोन वर्षे शोध घेऊनही विवाहिता न सापडल्याने अखेर गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष 10 कडे वर्ग करण्यात आला. कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. विवाहितेच्या उत्तरप्रदेशातील माहेरी, तसेच नालासोपारा येथील नातेवाईकांकडेही शोध घेण्यात आला. मात्र ती सापडली नाही. अखेर गुन्हेशाखेने विवाहितेच्या पतीने संशय व्यक्त केलेल्या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली. दोन्ही संशयितांचे तांत्रिक पुरावे तसेच मानसशास्त्रीय चाचण्याही घेतल्या. मात्र त्यात काहीच सापडले नाही. अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात केलेल्या चौकशीत विवाहितेचा भाऊ ती राहात असलेल्या शेजारी महिलेच्या घरी येत असल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे भावाचा माग काढत पोलीस रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पोहचले. स्थानिकांकडे केलेल्या चौकशीत बेपत्ता विवाहिता एका तरुणासोबत राहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेत मुंबईत आणत गुन्ह्याची उकल केली आहे.