Fri, Jan 18, 2019 06:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेजवान चटणीवरून महिलेची वेटरकडून हत्या

शेजवान चटणीवरून महिलेची वेटरकडून हत्या

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 2:12AMमुंबई : प्रतिनिधी

शेजवान चटणी देण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका महिलेचा नाहक बळी गेल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. सबा दाऊद शेख असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी साकिनाका पोलिसांनी सागर हॉटेलचा वेटर मोहम्मद राशिद शौकतअली शेख (32) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

व्यवसायाने रिक्षाचालक असलेले तक्रारदार दाऊद मेहमूद शेख हे त्यांच्या कुटुंबियांसोबत साकिनाका येथील जरीमरी, हाशमुद्दीन कंपाऊंडमध्ये राहतात. सबा ही त्यांची पत्नी असून रविवारी दुपारी तीन वाजता ते सबा आणि मित्र परवेज यांच्यासोबत त्याच परिसरात असलेल्या सागर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

जेवताना त्यांनी हॉटेलचा वेटर मोहम्मद राशिदकडे शेजवान चटणीची मागणी केली, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर दाऊदने पुन्हा शेजवान चटणीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने स्वतः ही चटणी घेण्यास सांगितले.

यावेळी दाऊदने तो वेटर असल्याने त्यानेच शेजवान चटणी द्यावी असे सांगितले. याच कारणावरुन या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या मोहम्मद राशिदने दाऊदच्या कानशिलात लगावली, यावेळी सबाने त्याला जाब विचारला असता त्याने तिलाही मारहाण केली. त्यात ती खाली कोसळली. तिला दाऊद व परवेजने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. साकिनाका पोलिसांना दाऊद शेखच्या जबानीवरुन घडलेला प्रकार समजला. पोलिसांनी मोहम्मद राशिदविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांनी अटक केली.