Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीबहाद्दर महिला पत्रकाराची जेलवारी

खंडणीबहाद्दर महिला पत्रकाराची जेलवारी

Published On: Jan 19 2018 2:11AM | Last Updated: Jan 19 2018 1:35AMडोंबिवली : वार्ताहर

ठाकुर्ली-चोळेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खंडणीखोर कथित पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ती चारूशीला पाटील हिची रवानगी आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे. गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

पाटील हिला ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीमधील काही रक्कम स्वीकारताना रविवारी रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या होत्या. यात कल्याण न्यायालयाने तिला 18 जानेवारीपर्यंत (3 दिवस) पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीकरीता सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती करण्यात आली. मात्र देण्यात आलेली पोलीस कोठडी पुरेशी होती, असे मत व्यक्त करत आरोपीच्या वकिलांनी सरकारी वकिलांची मागणी अमान्य करण्याची विनंती केली. त्यात न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

यावेळी आरोपीच्या वकिलांतर्फे जामीन अर्ज सादर न झाल्याने पाटील हिची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान आरोपी चारूशीला पाटील हिच्यावतीने न्यायालयाच्या आवरात उपस्थित तक्रारदार व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ-दमदाटी करण्याचा प्रकारही घडला. याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली जाणार असल्याचे या प्रकरणातील तक्रारदार सुरेंद्र पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.