Sat, Nov 17, 2018 14:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बायकोने वारंवार माहेरी जाणे म्हणजे छळ नव्हे

बायकोने वारंवार माहेरी जाणे म्हणजे छळ नव्हे

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी

पत्नीने वारंवार माहेरी जाण्याने कू्ररता आणि मानसिक छळ होतो असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. पत्नी माहेरी जाते म्हणून घटस्फोटाचा दावा करणार्‍या पतीची याचिका न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नुकतीच फेटाळून लावली. 22वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला. कालांतराने पत्नी वारंवार माहेरी जाऊ लागली. सासरच्या घराकडे पूर्णत: पाठ फिरवली़  आजी आणि आई अंथरुणाला खिळली असताना बायको एकाकी सोडून गेली. 

अनेकदा तिला पुन्हा घरी नांदण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने असहमती दर्शवली. याचदरम्यान पत्नीने दरमहा 1500 रुपयांच्या पोटगीची मागणी केली. हा सर्व प्रकार छळाचाच एक भाग असल्यामुळे न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजूर करावा, अशी विनंती करणारी याचिका संबंधित पतीने उच्च न्यायालयात दाखल केली.न्यायमूर्ती डांगरे यांनी हा दावा फेटाळून लावला. बायको वारंवार माहेरी जाते हा सर्वसाधारण स्वरूपाचा आरोप असून, त्याला छळ म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.